May 18, 2024

विराज जोशी यांना सामापा युवा रत्न सन्मान जाहीर

पुणे, दि. १९ ऑक्टोबर, २०२३ : किराणा घराण्याचे आश्वासक युवा गायक विराज जोशी यांना प्रतिष्ठेचा सामापा युवा रत्न सन्मान २०२३ जाहीर झाला आहे. दिल्लीस्थित प्रतिष्ठित सोपोरी अॅकॅडमी ऑफ म्युझिक अँड परफॉर्मिंग आर्ट्स संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या १९ व्या सामापा संगीत संमलनात या पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. सदर कार्यक्रम नवी दिल्ली येथील कामानी सभागृह या ठिकाणी ५ नोव्हेंबर रोजी सायं ६ वाजता संपन्न होणार आहे. अभिजात भारतीय संगीतातील विराज यांच्या अनुकरणीय कामाबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा हा सन्मान करण्यात येत आहे. विराज जोशी हे भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे नातू असून आपले वडील श्रीनिवास जोशी यांकडे ते सध्या संगीताचे शिक्षण घेत आहेत.

सुप्रसिद्ध संतूरवादक पं भजन सोपोरी यांच्या प्रयत्नांतून सोपोरी अॅकॅडमी ऑफ म्युझिक अँड परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थेची स्थापना झाली असून जम्मू आणि काश्मीर यांच्याशी उर्वरित देशाचे सौदार्ह्याचे संबंध संगीताच्या माध्यमातून कायम राहावेत, या उदात्त हेतून दरवर्षी सामापा संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात येत असते. पारंपारिक भारतीय शास्त्रीय संगीताच्या शिक्षणासोबतच, सादरीकरण आणि संगीताचा प्रचार प्रसार व्हावा हा संस्थेचा मुख्य उद्देश असून तरुण आश्वासक कलाकारांना एक ताकदीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचाही संस्थेचा प्रयत्न असतो, यामुळेच यावर्षीचा सामापा युवा रत्न सन्मान किराणा घराण्याचे आश्वासक गायक विराज जोशी यांना आम्ही जाहीर करीत आहोत अशी माहिती संस्थेचे सरचिटणीस आणि संतूर वादक, संगीतकार पं अभय रुस्तुम सोपोरी यांनी कळविली आहे. कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच एक उत्तम श्रोता घडविण्यासाठी देखील संस्था प्रयत्न करीत असते, असेही त्यांनी नमूद केले.

सामापा संमेलन हे दिल्लीतील एक प्रतिष्ठेचे संमेलन असून त्यांच्या वतीने जाहीर झालेला सामापा युवा रत्न पुरस्कार माझ्यासाठी एक महत्त्वाची बाब आहे. कौतुकासोबतच जबाबदारीची जाणीव करून देणारा हा पुरस्कार मला जाहीर केल्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया विराज जोशी यांनी व्यक्त केली.

संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी कर्नाटक सरकारतर्फे २०२२ साली युवा प्रशस्ती राष्ट्रीय पुरस्काराने देखील विराज जोशी यांचा नुकताच सन्मान करण्यात आला असून हा पुरस्कार मिळविणारा विराज सर्वात कमी वयाचा मानकरी ठरला होता. याबरोबरच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विराज यांना प्रतिष्ठेची एम एस सुब्बुलक्ष्मी शिष्यवृत्ती देखील मिळाली होती.