July 8, 2025

आषाढी वारी पालखी सोहळा २०२५: पुणे शहर सज्ज; वाहतूक नियोजन, सुरक्षा बंदोबस्त, ऑनलाइन सुविधा उपलब्ध

पुणे , १८ जून २०२५ ः यंदाचा आषाढी वारी पालखी सोहळा दिनांक २० जून ते २३ जून २०२५ या कालावधीत पुणे शहरात पार पडणार आहे. संत श्री तुकाराम महाराज व संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे आगमन, मुक्काम आणि प्रस्थान या कालावधीत नियोजित असून, पुणे शहर पोलीस आयुक्तालय, वाहतूक विभाग आणि विविध शासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय साधून व्यापक तयारी करण्यात आली आहे.

हा ऐतिहासिक आणि श्रद्धेचा सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातील लाखो वारकरी आणि देश-विदेशातून पर्यटक पुण्यात दाखल होतात. लाखोंच्या गर्दीत कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने सुरक्षेपासून वाहतुकीपर्यंत सर्व स्तरांवर काटेकोर नियोजन केले आहे.

पालखी वेळापत्रक
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी : २० जून रोजी पुणे शहरात आगमन
संत तुकाराम महाराज पालखी : २० जून रोजी पुणे शहरात आगमन
दोन्ही पालख्या २३ जून रोजी पुण्यातून प्रस्थान करणार

वाहतूक नियंत्रण आणि बदल
पुणे शहरात प्रवेश करणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांसाठी १९ जूनच्या रात्री १० वाजल्यापासून २३ जूनच्या रात्री ११ वाजेपर्यंत २४ तास वाहतूक प्रतिबंध लागू राहणार.
पालखी मार्गावरील आणि आसपासच्या रस्त्यांवरील रहदारीत बदल करण्यात आले असून, संबंधित भागात वाहने वळवली जाणार आहेत.
संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांच्या आगमन व प्रस्थानवेळी वाहतूक पोलिसांकडून ठरवलेले २८ प्रमुख ‘डायव्हर्जन पॉईंट्स’ कार्यरत राहणार.

मुख्य वळविण्यात येणारे रस्ते
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी : पुणे ३८ कि.मी. पर्यंत
संत तुकाराम महाराज पालखी : पुणे २३० कि.मी. पर्यंत
या मार्गांवरून येणाऱ्या वाहने पर्यायी मार्गांनी वळवली जाणार.

सुरक्षा आणि पोलिस बंदोबस्त ः
पुणे शहरात संभाव्य गर्दी, चेंगराचेंगरी, चोरी, साखळी चोरी (चेन स्नॅचिंग), पिकपॉकेटींग, घातपात यांसारख्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष बंदोबस्त आखण्यात आला आहे:

पोलीस अधिकारी व कर्मचारी:
सपोआ ः ०४
पोलीस निरीक्षक : १९
सपोनि/पोउनि : ४४
अमंलदार : १,११०

विशेष उपाययोजना:
संपूर्ण मार्गावर CCTV निगराणी
महत्वाच्या ठिकाणी पोलीस मदत केंद्र
महिलांसाठी स्वतंत्र सुरक्षा पथक
तपास व गुन्हे शाखेच्या विशेष टीम

Live Location:
पालखीची Live Tracking सुविधा पुणे पोलिसांच्या सोशल मीडियावर उपलब्ध राहणार आहे.

वाहतूक माहिती:
वाहतूक मार्गांबाबत माहिती https://diversion.punepolice.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल.

अन्य सुविधा आणि समन्वय ः
पीडब्ल्यूडी, महापालिका, महावितरण, मेट्रो, अग्निशामक दल यांच्यासोबत समन्वय बैठका पार पडल्या आहेत.
पालखी ट्रस्ट व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून सर्व नियोजन अंतिम करण्यात आले आहे.
विसावा व मुक्कामस्थळी बॅरिकेटिंग, मेडिकल सेवा, शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहनधारकांना आवाहन
पालखी मार्गावर येणाऱ्या नागरिकांनी यासाठी नियोजित पर्यायी मार्गांचा उपयोग करावा व वाहतूक पोलीस विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच या काळात आपत्कालीन सेवा वगळता इतर खासगी वाहनांना पालखी मार्गावर प्रवेश मर्यादित करण्यात येईल.

शहरातील विविध चौकांमध्ये सूचना फलक, पोलीस बंदोबस्त व माहिती केंद्र कार्यान्वित करण्यात येणार असून, नागरिकांनी सहकार्य करून पालखी सोहळा सुरळीत पार पडावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.