July 8, 2025

पुणे: हिंजवडीतील नागरी समस्या सोडविण्यासाठी उपाययोजनांवर भर

पुणे, १८ जून २०२५: हिंजवडी फेज १, २ आणि ३ परिसरातील मेट्रो मार्गिकेलगत तसेच अन्य भागातील रस्ते, पावसाळी पाण्याचा निचरा, रस्ता दुरुस्ती आणि इतर मूलभूत नागरी सुविधांच्या समस्यांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून कामे वेगाने सुरु आहेत.

महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी यासंदर्भात गेल्या आठवड्यात बैठक घेऊन आवश्यक कामांना गती देण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या सूचनांनुसार अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, पीएमआरडीएचे मुख्य अभियंता रिनाज पठाण, नितीन वानखेडे आदी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू आहेत.

सध्या सुरू असलेली प्रमुख कामे:
१) मेट्रो सवलतकार कंपनीमार्फत मेट्रो स्थानक व वायाडक्टदरम्यान साचलेला राडारोडा उचलण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
२) एमआयडीसीमार्फत डोहलर कंपनीसमोर, साई प्रोविजो इमारतीसमोरील भागात आणि मेट्रो स्थानक क्र. २ शेजारील वनविभागाच्या जागेत पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारी बसवण्याचे काम सुरू आहे.
३) मेट्रो मार्गिकेलगतच्या नाल्यांची साफसफाई एमआयडीसीमार्फत केली जात आहे.
४) विकास परवानगी विभागाने विलास जावडेकर प्रकल्पास नोटीस दिली असून, अनधिकृत बांधकाम विभागामार्फत स्थानक क्र. ३ येथे अनधिकृत रॅम्प तोडण्याचे काम सुरू आहे. तसेच, पांडवनगर परिसरातील राडारोड्याची विल्हेवाट करण्यात आली आहे.
५) एमआयडीसी, प्राधिकरण व टाटा कंपनीच्या प्रतिनिधींनी पथदिवे हस्तांतरणासंबंधी संयुक्त पाहणी केली असून, सूचनेनुसार दुरुस्तीचे काम सुरू आहे.
६) मेट्रो स्थानक क्रमांक १ समोरील मुख्य रस्त्यावर अनधिकृत स्टॉल हटवण्यात आले आहेत.
७) खड्डे बुजविण्याचे काम मेट्रो सवलतकार कंपनी आणि एमआयडीसीमार्फत सुरू आहे.
८) टाटा कंपनीमार्फत स्थानकांवर दिशादर्शक व माहिती फलक लावण्यात आले आहेत.

या उपाययोजनांमुळे हिंजवडी परिसरातील नागरी सुविधांच्या अडचणींचा लवकरच निचरा होण्याची अपेक्षा आहे.