पुणे, ४ सप्टेंबर २०२४ : ‘बदलापूर आणि मालवण येथील दुर्घटनेतील आरोपी हे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालक यांच्या संबंधित आहेत. त्यामुळेच आठ दिवसानंतरही ते सापडत नाही,’’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांच्यावर कॉंग्रेसकडून बुधवारी थेट आरोप करण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकार हे इंव्हेट सरकार असून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे वाट लागली आहे. राज्याच्या इतिहासातील आतापर्यंतचा हा सर्वात निष्क्रीय गृहमंत्री आहे,’ अशी टीकाही त्यावेळी पक्षाच्या नेत्यांनी केली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी आज पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रणिती शिंदे, सतेज पाटील यांच्यासह शहर व जिल्हाध्यक्ष, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेत घेऊन राज्यातील महायुती सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करण्यात आली.
पुण्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. कोयता गँगने उच्छाद मांडला आहे. गोळीबार होत आहे. सरकारचा वचक संपला आहे.. पोलिसांच्या बदलण्यासाठी पैसे घेतले जातात. कायदा व्यवस्था राखण्यापेक्षा हे सरकार वसुलीवर अधिक भर देत आहे, अशी टीका करून नाना पटोले म्हणाले,‘‘ पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची निवड चुकीच्या पद्धतीने झाली आहे. मालवण आणि बदलापूर घटनेतील आरोपी पाकिस्तानमध्ये आहे का. अजून कसे सापडत नाहीत. फडणवीस आणि आरोपी यांच्यात साटेलोटे असून शुक्ला त्यांना मदत करत आहे.’
पूरपरिस्थीतीने शेतकरी हैराण आहे. एमपीएसी विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडले जात आहे. शाळांमध्ये लहान मुली असुरक्षित आहे. शक्ती कायदा आणला, परंतु त्याला अद्याप मान्यता मिळाली नाही. लाडकी बहीण योजना हा इव्हेंट असून त्याच्या प्रचारासाठी ४७० कोटी रुपये खर्च झाला आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे, असेही पटोले म्हणाले.
सरकारी तिजोरी साफ करून मतदान मिळवण्यासाठी हे सरकार अहोरात्र काम करत आहे, असा आरोप करून वडेट्टीवार म्हणाले,‘‘ शिल्पकार जयदीप आपटे याने कुठे आश्रय घेतला आहे. टक्केवारी मध्ये या सरकारचा कोणी हात धरू शकत नाही. राज्याची अस्मिता व अभिमान गुजरातच्या दावणीला बांधला आहे. एसटीचा संप सुरू आहे. आमचे सरकार असताना एक म्होरक्या पुढे करून आंदोलन केले होते. तेव्हा विलीनीकरण करण्याची मागणी केली जात होती. आता गप्प का. ’’
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन