पुणे, दि. ४ सप्टेंबर, २०२४ : शहरात सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्पांवर कामगारांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देत चांगले काम करणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने प्राईड सर्वोत्तम सुविधा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे हे सलग चौथे वर्ष असून या स्पर्धेतील विजेत्यांना नुकतेच पुणे विभागाचे अतिरिक्त कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करीत सन्मानित करण्यात आले.
क्रेडाई पुणे मेट्रोच्या कामगार कल्याण समितीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या प्राईड सर्वोत्तम सुविधा पुरस्कारांचे वितरण नुकतेच कॅम्प परिसरातील संस्थेच्या रामकुमार राठी सभागृहात संपन्न झाले. दिल्लीस्थित क्वालिटी काउंसिल ऑफ इंडिया (भारतीय गुणवत्ता परिष)च्या मुख्य सल्लागार हेमगौरी भंडारी, प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण विभागाचे संचालक अलोक जैन, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजीत नाईकनवरे, प्राईड सर्वोत्तम सुविधा स्पर्धेचे अध्यक्ष व क्रेडाई कुशलचे अध्यक्ष जे पी श्रॉफ, क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष अरविंद जैन, सचिव अश्विन त्रिमल, कामगार कल्याण समिती समन्वयक सपना राठी यावेळी उपस्थित होत्या. या स्पर्धेविषयक एसओपी प्रक्रिया पुस्तिकेचे प्रकाशन देखील यावेळी संपन्न झाले.
यावर्षी पुरस्कार मिळालेल्या विविध विभागात व्हीटीपी रिअल्टी (प्रकल्प- व्हीटीपी अल्टेर), रोहन बिल्डर्स (प्रकल्प – रोहन आनंद), लेगसी लाईफस्पेसेस (प्रकल्प – दी स्टेटमेंट), विलास जावडेकर डेव्हलपर्स (प्रकल्प – यशविन अर्बो सेंट्रो), व्हीटीपी रिअल्टी (प्रकल्प – व्हीटीपी युफोरिया), रोहन बिल्डर्स (प्रकल्प – रोहन अभिलाशा, प्राईड बिल्डर्स (प्रकल्प – प्राईड वर्ल्ड सिटी) आणि मालपाणी इस्टेट (प्रकल्प – एम आर्यभट्ट) यांचा समावेश आहे.
यासोबतच यावर्षी प्रदान करण्यात आलेले प्राईड सर्वोत्तम सुविधा विशेष पुरस्कार एसजे कन्स्ट्रक्शन्स (प्रकल्प – एपी ४), पंचशील रिअल्टी (प्रकल्प – व्हॅन्टेज टॉवर), बी जे शिर्के कन्स्ट्रक्शन्स (प्रकल्प – पीएमसी नदी पुनरुज्जन), भाटे अँड राजे कन्स्ट्रक्शन्स (प्रकल्प – टॉवर दसाँ सिस्टीम सोल्युशन्स लॅब), शुभम ईपीसी (प्रकल्प – एसटीटी – डीसी ०५) आणि मंगलम् लंडमार्कस (प्रकल्प – मंगलम् डेस्टनेशन्स) यांना प्रदान करण्यात आले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना शैलेंद्र पोळ म्हणाले, “पुण्यात क्रेडाई पुणे मेट्रोच्या अनेकविध उपक्रमांतर्गत कामगारांना रोजी- रोटी, रोजच्या उदारनिर्वाहासाठीच्या आवश्यक सुविधा, आरोग्य सेवा, भविष्यात उपयोगी पडेल असे कौशल्य प्रशिक्षण आणि प्रगती करण्यासाठीच्या संधी निर्माण करून देत त्यांची काळजी देखील घेतल्या जाते. कामगारांसोबत काम करीत असताना त्यांच्यासाठी अशा प्रकारची तळमळ मला आजवर केवळ पुण्यातच पहायला मिळाली. त्यामुळे कामगार कल्याण क्षेत्रात क्रेडाई पुणे मेट्रो करीत असलेले काम कौतुकास्पद आहे.” राज्यासोबतच देशातील उर्वरित क्रेडाईचे विभाग व कामगारांसाठी काम करणाऱ्या इतर संघटनांनी पुणे क्रेडाई मेट्रोचा आदर्श घेत काम करायला हवे, असेही पोळ यांनी सांगितले.
आज कौशल्यपूर्ण कामगार न मिळणे ही बांधकाम व्यवसायातील मोठी समस्या असताना उपलब्ध कामगारांचा कौशल्यविकास करायचा असेल तर त्यांना आवश्यक सोयी सुविधा, प्रशिक्षण, आरोग्य व दैनंदिन गरजेच्या सुविधा पुरविणे महत्त्वाचे आहे असे आम्हाला वाटते. याच भावनेने आम्ही या स्पर्धांचे आयोजन करीत बांधकाम व्यवसायिकांना प्रोत्साहन देणे व जागृती करणे यासाठी प्रयत्नशील आहोत, असे रणजीत नाईकनवरे यांनी नमूद केले.
इतर बाबींप्रमाणे कामगार कल्याण क्षेत्रात देखील पुणे राज्यासह देशासाठी एक प्रणेते ठरत आहे याचा आनंद असल्याचे हेमगौरी भंडारी म्हणाल्या. क्रेडाई पुणे मेट्रो ही संघटना कामगार त्यातही महिला कामगार कल्याण क्षेत्रात करीत असलेले काम उल्लेखनीय असल्याचे अलोक जैन यांनी सांगितले.
क्रेडाई पुणे मेट्रोच्या कामगार कल्याण समितीच्या समन्वयक सपना राठी, सह समन्वयक मिलिंद तलाठी व पराग पाटील, समिती सदस्या रश्मी लोढा यांनी प्राईड सुविधा पुरस्कार स्पर्धेचे काम पाहिले. सपना राठी यांनी या पुरस्काराच्या विविध श्रेणी, विभाग आणि प्रक्रियेची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. अर्चाना बढेरा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर मिलिंद तलाठी यांनी आभार मानले.
प्राईड सर्वोत्तम सुविधा पुरस्कारांचा संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे –
२१ ते १०० कामगार संख्या असलेला विभाग
व्हीटीपी रिअल्टी (प्रकल्प- व्हीटीपी अल्टेर) व रोहन बिल्डर्स (प्रकल्प – रोहन आनंद) – सुवर्ण पुरस्कार
लेगसी लाईफस्पेसेस (प्रकल्प – दी स्टेटमेंट) – रौप्य पुरस्कार
१०१ ते ३०० कामगार संख्या असलेला विभाग
विलास जावडेकर डेव्हलपर्स (प्रकल्प – यशविन अर्बो सेंट्रो) – सुवर्ण पुरस्कार
व्हीटीपी रिअल्टी (प्रकल्प – व्हीटीपी युफोरिया) – रौप्य पुरस्कार
३०० हून अधिक कामगार असलेला विभाग
रोहन बिल्डर्स (प्रकल्प – रोहन अभिलाशा ३) व प्राईड बिल्डर्स (प्रकल्प – प्राईड वर्ल्ड सिटी) – सुवर्ण पुरस्कार
मालपाणी इस्टेट (प्रकल्प – एम आर्यभट्ट) – रौप्य पुरस्कार
प्राईड सर्वोत्तम सुविधा विशेष पुरस्कार
एसजे कन्स्ट्रक्शन्स (प्रकल्प – एपी ४) – कामगारांची सर्वाधिक बीओसीडब्लू नोंदणी व
पंचशील रिअल्टी (प्रकल्प – व्हॅन्टेज टॉवर) – आरोग्य विभाग
बी जे शिर्के कन्स्ट्रक्शन्स (प्रकल्प – पीएमसी नदी पुनरुज्जन) – क्रेशे सुविधा
भाटे अँड राजे कन्स्ट्रक्शन्स (प्रकल्प – टॉवर दसाँ सिस्टीम सोल्युशन्स लॅब) – स्किलिंग
शुभम ईपीसी (प्रकल्प – एसटीटी – डीसी ०५) – नाविन्यता (इनोव्हेशन)
मंगलम् लंडमार्कस (प्रकल्प – मंगलम् डेस्टनेशन्स) – महिला कामगार कल्याण
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन