May 19, 2024

सुमधुर गायन, वादनाने भारतरत्न पं भीमसेन जोशी संगीत महोत्सव संपन्न

पुणे, दि. १९ जून, २०२३ : कलाश्री संगीत मंडळ व द औंध सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच पं भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. औंध येथील पं भीमसेन जोशी कलामंदिर येथे आयोजित या महोत्सवात रसिक श्रोत्यांनी सुमधुर गायन आणि वादनाची अविस्मरणीय अनुभूती घेतली. यावर्षीच्या महोत्सवाला अभिजित गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले, महोत्वाचे हे १० वे वर्षे होते.

सुप्रसिद्ध बासरीवादक पं केशव गिंडे यांचे युवा शिष्य सिद्धांत कांबळे यांच्या बासरीवादनाने महोत्सवाला सुरुवात झाली. विलंबित एकतालात सिद्धांत यांनी राग यमनचे रागवाचक स्वरसमूह वेधक पद्धतीने मांडले. द्रुत त्रितालात पं. पन्नालाल घोष यांची रचना सादर करून ‘आता कोठे धावे मन’ या अभंगाने सिद्धांत यांनी वादनाची सांगता केली. यश त्रिशरण यांनी तबल्यावर साथ केली. यानंतर पं. श्रीकांत देशपांडे यांचे शिष्य व किराणा घराण्याचे गायक पं सुधाकर चव्हाण यांचे गायन झाले. त्यांनी राग बिहागमध्ये विलंबित एकतालात ‘कैसे सुख सोवे’ ही रचना सादर करून रागरूप यथार्थ दर्शविले. त्याला जोडून ‘आली रे आली अलबेली’ ही बंदिश आणि तराणा दमदारपणे सादर केला. ‘काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल…’ या भजनाने पं. चव्हाण यांनी आपल्या गायनाची सांगता केली. त्यांना नंदकिशोर ढोरे (तबला), प्रभाकर पांडव (हार्मोनियम), शाश्वती चव्हाण आणि अभयसिंह वाकचौरे (स्वरसाथ), गंभीर महाराज अवचार (पखवाज) यांनी साथसंगत केली. प्रसिद्ध गायिका मंजुषा पाटील यांच्या गायनाने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला. त्यांनी राग जोगकंस मध्ये ‘सुघर वर पायो’ आणि ‘पीर पराई’ या गाजलेल्या बंदिशीचे तडफदार सादरीकरण केले. त्यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) आणि प्रशांत पांडव (तबला) तसेच नुपूर देसाई आणि तनिष्क अरोरा यांनी स्वरसाथ केली.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात भेंडीबाजार घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या शिष्या आणि प्रतिभावान गायिका किशोरी जानोरीकर यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग पुरिया धनाश्री सादर केला. यामध्ये त्यांनी विलंबित एकतालात ‘नैना बाट निहारे…’ ही बंदिश प्रस्तुत केली. यानंतर ख्याल आणि ‘मजवरी तयांचे प्रेम…’ हे नाट्यगीत सादर केले. त्यांना गंगाधर शिंदे (संवादिनी), किशोर कोरडे (तबला) यांनी साथसंगत केली.

यांतर तरुण पिढीचे आश्वासक वादक आणि पं शिवकुमार शर्मा यांचे शिष्य डॉ. शंतनू गोखले यांचे संतूरवादन संपन्न झाले. त्यांनी राग बागेश्रीमध्ये आलाप, जोड, झाला यांचे दमदार सादरीकरण केले. विलंबित रूपक ताल आणि द्रुत तीनतालात त्यांनी पं शिवकुमार शर्मा यांच्या रचना सादर केल्या. पहाडी धून प्रस्तुत करीत त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप पं शौनक अभिषेकी यांच्या गायनाने झाला. यांनी राग गोरख कल्याण प्रस्तुत केला. यामध्ये त्यांनी ‘येरी माई…’ ही विलंबित एकतालातील रचना सादर केली. ‘घेई छंद मकरंद’ या नाट्यगीताने त्यांनी समारोप केला.

भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांच्या गायनाने महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. विराज यांनी यावेळी राग पुरिया सादर केला. यामध्ये त्यांनी ‘पिया गुणवता…’ ही विलंबित एकतालातील बंदिश आणि ‘घडिये दिना…’ हा छोटा ख्याल प्रस्तुत केला. ‘माझे माहेर पंढरी…’ या अभंगाने त्यांनी समारोप केला. पांडूरंग पवार (तबला), अविनाश दिघे (संवादिनी) यांनी साथसंगत केली.

सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या गायनाने तिसऱ्या दिवसाचा व महोत्सवाचा समारोप झाला. त्यांनी राग मिया मल्हार सादर केला. यामध्ये त्यांनी ‘ए अत धूम…’ ही विलंबित तीनतालातील बंदिश आणि ‘नादब्रह्म परमेश्वर…’ हा एकतालातील ख्याल सादर केला. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली. आकाश थिटे यांनी संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.