पिंपरी-चिंचवड, २५/०४/२०२५: पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांची वाढती लोकसंख्या विचारात घेवून वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पीएमपीएमएल व मेट्रो या सार्वजनिक प्रवासी वाहतूक पुरविणाऱ्या संस्थांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पीएमपीएमएल चे चऱ्होली व माण हे दोन नवीन ई-बस डेपो म्हणजे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांना गती देणारा नवा टप्पा आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
पीएमपीएमएल च्या ‘चऱ्होली’ व ‘माण’ या दोन नवीन ई-बस डेपोंच्या उद्घाटन प्रसंगी चऱ्होली ई-बस डेपो मध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास आमदार बापूसाहेब पठारे, पिंपरी-चिंचवड मनपाचे माजी महापौर मा. योगेश बहल, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, पीएमपीएमएल च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्रीमती दिपा मुधोळ-मुंडे, सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी मा. प्रज्ञा पोतदार-पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
प्रास्ताविकपर भाषणात पीएमपीएमएल च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपा मुधोळ-मुंडे यांनी पीएमपीएमएल च्या सद्यस्थितीचा आढावा सादर केला. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. प्रज्ञा पोतदार-पवार यांनी आभार मानले.
पवार यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
पीएमपीएमएल ला पीएमआरडीए कडून ५०० सीएनजी बसेस व पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून ५०० सीएनजी बसेस तसेच जीसीसी तत्वावर ५०० ई-बसेस अशा एकूण १५०० बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
पीएमआरडीए कडून ५०० सीएनजी बसेस साठी लागणारा २३० कोटी रूपयांचा निधी पीएमपीएमएल कडे वर्ग.
लाखो लोक नोकरी, शिक्षण व रोजगाराच्या शोधात पुणे शहरात येत असतात. त्यांना बससेवा देण्यासाठी पीएमपीएमएल च्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे साधन उपलब्ध आहे.
उन्हाच्या वाढत्या पाऱ्यावर टिप्पणी करताना श्रीमंत माणूस स्वतःच्या एसी गाडीतून फिरतो परंतु कॉमन मॅन एसी बस मधून फिरला पाहिजे यासाठी सीएनजी बसेस एसी असाव्यात अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
चऱ्होली उपनगराची सध्याची लोकसंख्या १.५० लाख असून २०४१ साली ही लोकसंख्या १०.५० लाखांवर तर पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ६१ लाखांवर जाईल. वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहतूक समस्यांचा विचार करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
‘चऱ्होली’ व ‘माण’ या दोन नवीन ई-बस डेपोंच्या माध्यमातून प्रदूषण कमी होवून नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न.
ग्रीन महाराष्ट्र ही संकल्पना या दोन ई-बस डेपोंच्या माध्यमातून पुढे येत आहे.
पीएमपीएमएल मधील २४० दिवस पूर्ण केलेल्या १७४१ कर्मचाऱ्यांना कायम केले.
२०२० मध्ये १४६५ पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना कायम केले.
पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाचा ६८ महिन्यांचा फरक ४ टप्प्यात देण्यात येणार असून त्यापैकी एक हप्ता देण्यात आला आहे.
More Stories
पुणे: चाकणमध्ये कामावर निघालेल्या महिलेवर बलात्कार, आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांचा दहावीचा ९४.२० टक्के निकाल
पिंपरी चिंचवड शहर हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ लगत असणारे सेवा रस्ते होणार विकसित