पिंपरी-चिंचवड, २६ एप्रिल २०२५ : पर्यावरणपूरक आणि ऊर्जा स्वातंत्र्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत, कल्पतरू हार्मनी सीएचएसने २०० किलोवॅट क्षमतेच्या रूफटॉप सोलर पॉवर प्रकल्पाचे उद्घाटन केले. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते हा प्रकल्प सुरू करण्यात आला. ४७९ सदनिका आणि १४०० हून अधिक रहिवाशांची ही सोसायटी आता हरित ऊर्जेकडे वाटचाल करत आहे.
या उद्घाटन प्रसंगी माजी नागरसेक संदीप कस्पटे, गणेश कस्पटे, प्रसाद कस्पटे, रामदास कस्पटे, सुनील कस्पटे आणि अरविंद बारणे उपस्थित होते. सोसायटीच्या व्यवस्थापन समिती सदस्य आणि सौर उपसमितीचे सदस्य यांचा देखील उत्साही सहभाग पाहायला मिळाला.
शंकर जगताप यांनी पर्यावरण संवर्धनासाठी सोसायटीने घेतलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले आणि सोसायटीच्या व्यवस्थापन समिती तसेच रहिवाशांचे अभिनंदन केले. सोलर स्क्वेअर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने उभारलेला हा प्रकल्प पीसीएमसी क्षेत्रातील निवासी सोसायटींमध्ये सर्वात मोठ्या सौर प्रकल्पांपैकी एक ठरला आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :
– स्थापित क्षमता : २०० किलोवॅट
– सौर पॅनल्सची संख्या : ३७१ (हाफ-कट बायफेशियल ५४०डब्ल्यूपी)
– एकूण प्रकल्प खर्च : रु. १.२ कोटी
– वीज बिलांवर अपेक्षित वार्षिक बचत : सुमारे रु. ४८ लाख
– सीईओ₂ उत्सर्जनात अपेक्षित वार्षिक घट : सुमारे ४३५ मेट्रिक टन
या प्रकल्पाचा प्रवास एप्रिल २०२४ मध्ये उपयुक्तता अभ्यास, बजेटिंग आणि विक्रेत्यांचे मूल्यांकनापासून सुरू झाला होता. सप्टेंबर २०२४ मध्ये अंमलबजावणी सुरू होऊन एप्रिल २०२५ मध्ये यशस्वी पूर्णत्वास नेण्यात आली. ग्रिड-कनेक्टेड रूफटॉप सोलर प्रोग्राम अंतर्गत नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाकडून मिळालेल्या केंद्रीय आर्थिक सहाय्यामुळे प्रकल्पाची व्यवहार्यता वाढली.
कल्पतरू हार्मनी सीएचएसने यापूर्वीही पर्यावरणपूरक उपक्रमांत आपली वचनबद्धता दाखवली आहे. मार्च २०२५ मध्ये सोसायटीला एसओआरटी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ग्रीन अॅम्बेसेडर म्हणून मान्यता मिळाली आहे. याशिवाय, पाण्याच्या पुनर्वापरासाठी ३०० केएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया संयंत्राचे नूतनीकरण करून आरोग्य व सुरक्षिततेवरही विशेष भर दिला आहे.
More Stories
पुणे: चाकणमध्ये कामावर निघालेल्या महिलेवर बलात्कार, आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांचा दहावीचा ९४.२० टक्के निकाल
पिंपरी चिंचवड शहर हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ लगत असणारे सेवा रस्ते होणार विकसित