पुणे, दि. ११ जानेवारी, २०२५ : भारताच्या सुरक्षे समोर चीनचे मोठे आव्हान असून देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेमध्ये पाकिस्तान आपली मानसिक जागा व्यापत आहे. भविष्याचा विचार केल्यास भारतासमोर चीनचेच आव्हान मोठे राहणार आहे, त्यामुळे त्याच्याशी निगडित असणारे विषय हाताळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे मत जेष्ठ तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केले.
गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी ‘नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटजीज् फॉर अ १० ट्रिलियन डॉलर इकोनॉमी’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये भारतीय लष्करच्या नॉर्दन कमांड विभागाचे माजी जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ माजी लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा, भारताचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी सहभाग घेतला. भारताचे माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी त्यांच्याबरोबर संवाद साधला.
नजीकच्या भविष्याच्या दृष्टीने सामाजिक क्षेत्रातील धोरणात्मक विषयांवर (पब्लिक पॉलिसी) पुणे शहरात विचारविनिमय व्हावा, या उद्देशाने शहरातील युवा तज्ज्ञ व उद्योजकांनी एकत्र येत या दोन दिवसीय पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिव्हलचे आयोजन केले असून ‘नजीकच्या भविष्यात भारताची १० ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेविषयक कल्पना’ ही या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे. महोत्सवाचे आयोजक असलेले सिद्धार्थ देसाई, इंद्रनील चितळे, साहिल देव, ऋग्वेद देशपांडे हे देखील यावेळी उपस्थित होते. विद्यार्थी, संशोधक, शिक्षक, उद्योजक, व्यावसायिक यांसोबतच धोरण विषयातील तज्ज्ञ, धोरण निर्माते यांनीही यावेळी महोत्सवाला हजेरी लावली होती.
आपण सध्याच्या स्थितीमध्ये विचार केला तर आपल्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेमध्ये पाकिस्तान हा भारताची मानसिक जागा व्यापण्याचे काम करीत आहे, तर दुसरीकडे चीन हे मोठे आव्हान म्हणून समोर येत असल्याचे मत माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी व्यक्त केले.
चीनच्या भौगोलिक राजकारणाचा विचार केला तर जगभरातील सर्वात मोठे नौदल उभे करण्याचे काम चीन करत आहे. आपल्या सैन्याला सक्षम करण्यासाठी तिथे ‘थिएटररायझेशन इन आर्मी’ ही संकल्पना राबवण्यात येत आहे. भविष्यातील आव्हानाचा विचार केला तर भारतीय सैन्यान एकत्रितपणे काम करणे अंगवळणी पाडण्याची आवश्यकता आहे. भारतीय लष्करात देखील २०२५ मध्ये लक्षणीय सुधारणा होतील, असा विश्वास केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केला असल्याचे हुडा यावेळी म्हणाले.
सायबर सुरक्षेचा विषय हा गंभीर बनत चालला आहे, त्यामुळे त्याकडे देखील अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सायबर सुरक्षेचा विचार करता त्यासाठी चांगले सुरक्षा धोरण तयार करण्याची गरज असल्याचे मेनन यांनी नमूद केले.
भारतात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांपैकी पन्नास टक्के ही चीनी बनावटीची असतात, त्यामुळे अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. भारत चीनच्या पुरवठा साखळीवर अवलंबून आहोत. भारतामध्ये जे आयफोन तयार होतात, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या काही सुट्या भागाचा पुरवठा आपण करणार नसल्याचा इशारा चीन मधल्या एका कंपनीने दिला आहे, त्याचा विचार केला तर ती आपल्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे मेनन यांनी नमूद केले.
भारताच्या लगत असणाऱ्या देशांचा इथली राजकीय परिस्थिती आणि आर्थिक प्रगती याकडे लक्ष असते, त्याचा विचार करून धोरणे तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे मत भारताचे दिवंगत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी व्यक्त केल्याचे मेनन यावेळी म्हणाले.
तंत्रज्ञानात होत असणारे बदल, भविष्य काळात येणारी आव्हाने यांचा विचार करून प्रभावी सुरक्षा धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे, हे धोरण करताना त्यामध्ये देशाच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या सर्व घटकांचा विचार व्हायला हवा, त्यामध्ये भारतीय लष्कर, गृह विभाग यांचा सहभाग असायला हवा, त्याच्या आधारे दीर्घकालीन सुरक्षा धोरण तयार केल्यास त्याचा देशाच्या सुरक्षेसाठी चांगला फायदा होऊ शकतो, असे हुडा यांनी नमूद केले.
More Stories
देवयानी पवार करणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथे होणाऱ्या वार्षिक बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व
अचूक बिलिंगसाठी सदोष, नादुरुस्त मीटर तातडीने बदला: महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र यांचे निर्देश
सिंबायोसिस तर्फे “सिम-इमर्ज २०२५” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन