बारामती, दि. ११ जानेवारी, २०२५- तालुक्यातील अंजनगाव येथे नव्याने उभारलेल्या महावितरणच्या ३३/११ केव्ही अंजनगाव वीज उपकेंद्राचा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि. ११) शुभारंभ झाला. या उपकेंद्रामुळे अंजनगाव पंचक्रोशीतील सुमारे तीन हजार वीज ग्राहकांना पुरेशा दाबाने व सुरळीत वीजपुरवठा मिळणार आहे.
अंजनगाव (कऱ्हावागज) उपकेंद्र होण्यापूर्वी या परिसरातील गावांना व शेतीपंपांना बारामती शहरातील १३२/२२ केव्ही अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जात होता. परंतु या वीज वाहिनीची लांबी जास्त असल्यामुळे वीजपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत होत असे. ना. अजितदादा पवार यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे ७ कोटी ८५ लाख रुपये निधीतून अंजनगाव येथे ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रांची उभारणी झाली. या नवीन उपकेंदामध्ये ५ एमव्हीए क्षमतेचे २ अतिउच्चदाब रोहित्र आहेत. तसेच या उपकेंद्रातून अंजनगाव व कऱ्हावागज अशा दोन गावठाण वाहिन्या तर अंजनगाव व कऱ्हावागज दोन शेती वाहिन्या निघतात. ज्यापुढे जाऊन अंजनगाव, रानमळा, कुचेकरवस्ती, कऱ्हावागज शिवार, बनकरवस्ती, नेपतवळण, तांदळेवस्ती, नाळेवस्ती, खोमणेवस्ती, लष्करवस्ती या भागातील शेती व बिगरशेती ग्राहकांना पुरेशा दाबाने व अखंडित वीजपुरवठा करणार आहेत. या उपकेंद्रावर शेतीपंपाचे १६०० तर गावठाणचे १३०० वीजग्राहक येतात. २०२२ मध्ये कृषी आकस्मिक निधीतून (ACF) मंजूर झालेल्या अंजनगाव ३३/११ केव्ही वीज उपकेंद्र उभारणीचे काम मे. एसीडीसी साईदीप बिल्डकॉन प्रा.लि. यांनी केले आहे.
वीज उपकेंद्राच्या शुभारंभ प्रसंगी खा. सौ. सुप्रियाताई सुळे, अंजनगावच्या सरपंच सौ. प्रतिभा दिलीप परकाळे, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता दीपक लहामगे, कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर, म्हसू मिसाळ व प्रमोद रागीट, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते व विठ्ठल बडे, उपकार्यकारी अभियंता मोहन सूळ यांचेसह पंचक्रोशीतील नागरिक व अधिकारी वर्गाची उपस्थिती होती.
More Stories
देवयानी पवार करणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथे होणाऱ्या वार्षिक बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व
अचूक बिलिंगसाठी सदोष, नादुरुस्त मीटर तातडीने बदला: महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र यांचे निर्देश
सिंबायोसिस तर्फे “सिम-इमर्ज २०२५” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन