October 14, 2024

समान पाणीपुरवठा योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करा-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, 18 मार्च 2023-पुण्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पुणेकरांच्या किमान गरजांना प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे समान पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत,असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी येथील २४x७ समान पाणीपुरवठा योजना व सुस, म्हाळुंगे येथील नवीन पाणीपुरवठ्याच्या कामांचा आढावा घेण्यासाठी सफा बँक्वेट बाणेर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, २४x७ योजनेचे अधीक्षक अभियंता नंदकिशोर जगताप, पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रसन्न जोशी, उपअभियंता विनोद क्षीरसागर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, पुणे शहर हे राहण्यासाठी सर्वोत्तम शहर ठरत असल्याने लोकसंख्यादेखील झपाट्याने वाढत आहे. नागरिकांच्या किमान गरजांना प्राधान्य क्रम राहिला पाहिजे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून शहरात सुरू असलेली समान पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत. तसेच पाणीगळती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशा सूचना यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

पालकमंत्र्यांनी बाणेर-बालेवाडी पाणी पुरवठा जलवाहिनी आणि पंपिंगच्या कामाची माहिती घेतली. त्यांनी पाणी साठवण टाकीच्या कामाचीही पाहणी केली.

पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन
सध्या बदलत्या वातावरणामुळे उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. आगामी काळात सर्वांनी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. नागरिकांनी पिण्याचे पाणी गाडी धुणे, बांधकाम यांसारख्या तत्सम कामांसाठी वापरणे कटाक्षाने टाळावे.उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.