December 14, 2024

स्वातंत्र्यानंतर प्रथमच कॉंग्रेस पुणे जिल्ह्यातून हद्दपार

पुणे, २३ नोव्हेंबर २०२४: यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने इतिहास घडला आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यातून कॉंग्रेस हद्दपार झाली. शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघांपैकी एकही जागा महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसला मिळविता आली नाही. आत्मविश्‍वास गमाविलेल्या आणि अंतर्गत गटबाजीने पोखरलेल्या कॉंग्रेसला आत्मचिंतन करण्याची वेळ आणली.

राज्याच्या राजकारणात पुणे जिल्ह्याचे एक वेगळे स्थान आहे. १८८५ मध्ये कॉंग्रेसची स्थापना पुणे शहरात होणार होती. परंतु शहरात प्लेग आजाराची साथ मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे पुण्याऐवजी मुंबई येथे पक्षाच्या स्थापना झाली. १९४७ मध्ये देशाला स्वतंत्र मिळाले आणि १९५२ मध्ये देशात पहिल्यांदा विधानसभा आणि लोकसभा निवडणूका एकत्र झाल्या. तेव्हापासून या जिल्हयात कॉंग्रेसचे अस्तित्वात होते. १९७८ मध्ये कॉंग्रेस मध्ये फूट पडली. तरी देखील या जिल्ह्यावर कॉग्रेसचे वर्चस्व कायम राहिले. त्यानंतर १९९९ मध्ये पक्षात दुसरी फूट पडली आणि तेथून जिल्ह्यातील कॉंग्रेस कमकुवत झाली. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. तेव्हा कॉंग्रेसला जिल्हयात मोठे अपयश आले. त्यानंतर २००४, २००९ मध्ये झालेल्या निवडणुकांना दोन्ही कॉंग्रेस आघाडीच्या माध्यमातून लढल्या. तेव्हा जागा वाटपात कॉंग्रेसला पुणे जिल्ह्यातील दोन आणि पुणे शहरातील चार जागा वाट्याला आल्या. २०१४ च्या मोदी लाटेत जिल्हयात संग्राम थोपटे यांच्या रूपाने कॉंग्रेस जिवंत राहिली. तर शहरात एकही जागेवर पक्षाला विजय मिळविता आला नाही. २०१९ च्या निवडणुकीत मात्र पक्षाच्या परिस्थीतीत थोडा बदल होऊन कॉंग्रेसला दोन जागा मिळाल्या. परंतु पुणे शहरात एकाही जागा कॉंग्रेसला मिळविता आली नाही. २०२२ मध्ये कसबा विधानसभा मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांच्या विजयाने कॉंग्रेसला थोडी ऊर्जा मिळाली आणि पक्षाच्या आमदारांची संख्या तीनवर गेली.

यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पुणे शहरासह जिल्ह्यातील २१ पैकी पाच जागा कॉंग्रेसच्या वाट्याला आल्या. त्यापैकी चार जागांवर तरी पक्षाला यश मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु एकाही जागेवर कॉंग्रेसला विजय मिळविता आले नाही. या उलट बापू पठारे यांच्या विजयाने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अस्तित्व तरी टिकविता आले.

नेतृत्वाचा अभाव, अंतर्गत गटबाजी,आत्मविश्‍वास गमाविलेले नेते आणि पक्षापासून दूर झालेली तरुण पिढी यामुळे कॉंग्रेसची अवस्था अशी झाली आहे. त्यामुळे आज पुणे जिल्ह्यातून कॉंग्रेस हद्दपार झाली आहे. मुळापासून पक्ष बांधणी करण्याशिवाय पक्षापुढे दुसरा पर्याय राहिलेला नाही. त्यासाठी जुन्यांना घरी बसून नव्याने संधी देण्याची गरज आहे.