October 5, 2024

‘लाडकी बहीण’च्या विरोधात काँग्रेसच्या याचिकेने महिला विरोधी चेहरा उघड: भजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा घणाघात

मुंबई, २९ ऑगस्ट २०२४ ः लाडकी बहीण योजनेला महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांकडून जाणूनबुजून योजनेच्या विरोधात मोहीम सुरू आहे. योजनेचे यश डोळ्यात खुपत असल्याने काँग्रेस नेते सुनील केदार यांचा कार्यकर्ता असलेल्या अनिल वडपल्लीवार याने लाडकी बहिण योजने विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वडपल्लीवार यांच्या मार्फत काँग्रेस आणि महाविकास आघाडी, लाडकी बहिण योजनेविरोधातील त्यांचा अजेंडा राबवत आहे असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. या याचिकेमुळे काँग्रेसने आपला महिला विरोधी चेहरा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे असेही उपाध्ये यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

वडपल्लीवार यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत लाडकी बहीण योजना बंद करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसने यापूर्वीही लाडकी बहिण योजने विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावली होती. आता पुन्हा एकदा काँग्रेसचा बेगडीपणा उघड झाला आहे. महायुती सरकारच्या या योजनेचे महिलावर्गातून स्वागत होत आहे. या योजनेमुळे महिला वर्ग महायुतीच्या बाजूने झुकेल तसेच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला फटका बसेल या भीतीने काँग्रेस या ना त्या प्रकारे योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका उपाध्ये यांनी केली.

राज्यातील माताभगीनी आणि मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण आणि सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली. कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद पडणार नाही हे वारंवार महायुती सरकारकडून स्पष्ट करण्यात येत असूनही काँग्रेसकडून अपप्रचार केला जात आहे. विरोधाला विरोध करायचा या भूमिकेनुसार महिला हिताच्या या योजनेला आडकाठी करण्यात येत असून काँग्रेस आणि विरोधकांच्या भुलथापांना सूज्ञ जनता बळी पडणार नाही असेही उपाध्ये यांनी या पत्रकामध्ये म्हटले आहे.