पुणे, २९ आॅगस्ट २०२४ : शालेय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावरून राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यातील अशा प्रकारच्या घटना घडल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी शाळा सुरक्षा परिषद आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये शहरातील १ हजार २०० शाळांचे २ हजार ४०० मुख्याध्यापक व सचिव उपस्थित होते.श्री गणेश कला क्रिडामंच येथे ही परिषद आयोजित केली होती.गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे यांनी विदयार्थी यांचे सुरक्षेसंदर्भात पीपीटीद्वारे सादरीकरण करुन महिला व बालकांचे सुरक्षतेच्या अनुषंगाने नविन कायद्याची माहिती व पुणे शहर पोलिस आयुक्तालयातर्फे चालू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी रस्ता सुरक्षीततेबाबत सविस्तर माहिती देवून स्कुल बस धोरण समजावून सांगितले.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक संपत सुर्यवंशी यांनी वेळोवेळी शासनाने निर्गमीत केलेल्या शासन निर्णय व परिपत्रक यांची अंमलबजावणी करणेबाबत मार्गदर्शन केले. पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समजावून सांगून शाळेमध्ये घडत असलेल्या गैरप्रकारा बाबत उपाय योजना करणेचे मार्गदर्शन केले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, यांनी १२०० शाळेचे सुमारे ११ लाख विदयार्थी यांचे पर्यंत सदर परिषदेची माहिती देणेबाबत उपस्थितांना अहवान केले. विद्यार्थ्यांच्या स्कुलबस, रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची ने आण न करणेबाबत, शाळेच्या १०० यार्ड परिसरामध्ये पानटपरी असता कामा नये, शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवून ते सीसीटीव्ही १५ दिवसापर्यंत जतन करावे, तसेच शाळेमध्ये कार्यरत सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांची चारित्र्य पडताळणी करुन घ्यावी, शाळेचे सुरक्षासंबंधी कोणत्याही अडचणीस पुणे पोलीस मदतीसाठी सदैव तत्पर राहिल असे आश्वासन आयुक्तांनी दिले.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) पुणे जिल्हा परिषद पुणे डॉ. भाऊसाहेब कारेकर, अपर पोलिस आयुक्त (पुर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) प्रविणकुमार पाटील, पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त परिमंडळ १ संदीपसिंह गिल, पोलीस उपायुक्त परिमंडळ २ स्मार्तना पाटील, पोलिस उपायुक्त परिमंडळ ३ संभाजी कदम, पोलिस उपायुक्त परिमंडळ ४ हिम्मत जाधव, पोलिस उपायुक्त परिमंडळ ५ आर. राजा, पोलिस उपायुक्त विशेष शाखा श्री.जी. श्रीधर आदी उपस्थित होते.
More Stories
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आधार जोडणी करण्याचे आवाहन
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान