May 13, 2024

पुणे मेट्रो लाईन ३ साठी ४००० सेगमेंट्सची उभारणी पूर्ण

पुणे, २० सप्टेंबर २०२३: हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्पाच्या कामाने शाश्वत वेग पकडला आहे. विविध टप्प्यांतील कामे निश्चित गतीने पुढे सरकत आहेत. यापैकी एक महत्वपूर्ण टप्पा आज (बुधवारी) सकाळी गाठण्यात आला असून हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठीच्या ४००० सेगमेंट्सची उभारणी आज पूर्ण करण्यात आली आहे.

विशेष नमूद करण्याजोगी बाब म्हणजे, ३००० व्या सेगमेंटच्या उभारणीनंतर विकसकांनी गेल्या अवघ्या ६९ दिवसांत आणखी १००० सेगमेंट्सची विक्रमी उभारणी पूर्ण करून दाखवली आहे. गेल्या वर्षी (२३ जुलै २०२२ रोजी) या प्रकल्पाचा पहिला सेगमेंट हिंजवडी येथे कास्ट करण्यात आला होता; त्यानंतर पुढील १४ महिन्यांच्या कालावधीत तब्बल चार हजार सेगमेंट्स उभे करण्यात विकसकांनी यश प्राप्त केले आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो लाईन ३ चे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ‘पीएमआरडीए’ तर्फे सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर टाटा समूहाने हाती घेतले असून त्याच्या कार्यान्वनासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे.

“हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोच्या उभारणीमुळे सुलभ, वेगवान व स्वस्त सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी विकसक पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. याचेच फलित म्हणून अवघ्या ४०० दिवसांत (१४ महिने) चार हजार सेगमेंट्स उभारणी करणे तसेच काम सुरू झाल्यापासून वर्षभरातच एकूण खांब उभारणीपैकी ८०% खांब उभारणी पूर्ण करण्याचा टप्पा गाठण्यात आम्हाला यश मिळालेले आहे,” अशी माहिती पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आलोक कपूर यांनी दिली.

पुणेरी मेट्रो सेगमेंट उभारणी – एक दृष्टीक्षेप

सेगमेंट्सची संख्या कास्टिंगला लागलेला कालावधी
० ते १००० २८५ दिवस
१००१ ते २००० ९० दिवस
२००१ ते ३००० ७९ दिवस
३००१ ते ४००० ६९ दिवस

पुणे मेट्रो लाईन ३ बाबत माहिती:

पुणे मेट्रो लाईन ३ हा हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणारा २३ किमीचा उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प आहे. हा सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) प्रकल्प आहेजो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) द्वारे टाटा समूहाच्या ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (TUTPL) आणि सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स (Siemens Project Ventures GmbH) यांचा समावेश असलेल्या कन्सोर्टियमला प्रदान करण्यात आला आहे. हा प्रकल्प डिझाईनबिल्डफायनान्सऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOT) तत्त्वावर पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष उद्देश कंपनी द्वारे ३५ वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी विकसित आणि ऑपरेट केला जाणार आहे.