November 11, 2024

बाणेर रोडवर पुणे मेट्रो लाईन ३ साठी ‘प्लॅटफॉर्म पिअर आर्म’ (पीपीए) उभारणीला सुरुवात

पुणे१३ एप्रिल२०२३: हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्पाच्या एकूण कामाला आता अनेक विभागांमध्ये चांगली गती मिळालेली दिसून येत आहे. व्हायाडक्ट खांबांच्या जोडीनेआता स्टेशन इमारतीच्या खांब उभारणीचे काम देखील जोरात सुरू झालेले आहे. पुणे मेट्रो लाईन ३ च्या प्रस्तावित स्टेशन क्र. १८ च्या ‘प्लॅटफॉर्म पिअर आर्म’ (पीपीए) उभारणीला आज (गुरुवारी) सकाळी ‘यशदा’समोर (बाणेर रोड) सुरुवात करण्यात आली. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील या मेट्रोची एकूण २३ स्थानके असतील. यापैकी प्रत्येक स्थानकासाठीच्या खांबाला कॉनकॉर्स आणि प्लॅटफॉर्म स्तरासाठी असे प्रत्येकी २ “पीपीए आर्म” असतील. दखल घेण्याजोगी बाब म्हणजे, बरोबर एक वर्षभरापूर्वी याच दिवशी (१३ एप्रिल) गणेशखिंड रस्त्यावर पुणे मेट्रो लाईन ३ चा पहिला खांब उभारला गेला होता.

प्लॅटफॉर्म पिअर आर्म (PPA) म्हणजे काय?

प्लॅटफॉर्म आर्म हा मेट्रो स्टेशन उभरणीतील एक अत्यंत महत्वपूर्ण स्ट्रक्चरल घटक असतो. मेट्रो स्थानकाचा डोलारा सांभाळणाऱ्या खांबाला दोन्ही बाजूंनी झाडाच्या फांद्यांसारखे हे ‘पीपीए’ जोडले जातात ज्याच्यावर पुढे उभारण्यात येणारा मेट्रो स्थानकाचा पूर्ण प्लॅटफॉर्म तोलून धरला जाणार असतो. समोरून पाहील्यास याचा आकार शरीरापासून लांब पसरलेल्या दोन्ही हातासारखा दिसतो म्हणून याला प्लॅटफॉर्म पिअर आर्म (प्लॅटफॉर्मसाठीच्या खांबांचे हात) असे म्हटले जाते. उन्नत (एलेव्हेटेड) प्रकारातील कोणत्याही मेट्रो ट्रेन यंत्रणेमध्ये प्लॅटफॉर्मसाठीचे खांब आणि पिअर आर्म्स उभारणे हे सर्वात किचकट तसेच अतिशय महत्वाचे काम मानले जाते.

पुणे मेट्रो लाईन ३ बाबत माहिती:

पुणे मेट्रो लाईन ३ हा हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणारा २३ किमीचा उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प आहे. हा सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) प्रकल्प आहेजो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) द्वारे टाटा समूहाच्या ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (TUTPL) आणि सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स (Siemens Project Ventures GmbH) यांचा समावेश असलेल्या कन्सोर्टियमला प्रदान करण्यात आला आहे. हा प्रकल्प डिझाईनबिल्डफायनान्सऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOT) तत्त्वावर पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष उद्देश कंपनी द्वारे ३५ वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी विकसित आणि ऑपरेट केला जाणार आहे.