November 7, 2024

पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप(14 वर्षांखालील)क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट नेक्स्ट अकादमी, पूना क्लब संघात विजेतेपदासाठी लढत

पुणे, 27 मार्च 2023: पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप(14 वर्षांखालील)क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत क्रिकेट नेक्स्ट अकादमी संघाने चंद्रोस संघाचा पराभव केला तर यशवी संघाने पूना क्लब संघाला पुढे चाल दिली.

व्हिजडम क्रिकेट अकादमी मैदानावर झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रणय सिसवालच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर क्रिकेट नेक्स्ट अकादमी संघाने चंद्रोस संघाचा 130 धावांनी दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. पहिल्यांदा खेळताना क्रिकेट नेक्स्ट अकादमी संघाने 50 षटकांत 8 बाद 330 धावांचा डोंगर रचला. यात प्रणय सिसवालने केवळ 97 चेंडूत 22 चौकार व 5 षटकारांची फटकेबाजी करत दमदार 158 धावा करून संघाचा डाव भक्कम केला. कृष्णा पांडेने 47 धावा करून प्रणयला सुरेख साथ दिली. 330 धावांच्या आव्हानाचा सामना करताना शौर्य देशमुख, अर्णव अग्रवाल व प्रणय सिसवाल यांच्या अचूक गोलंदाजीने चंद्रोस संघाचा डाव 40 षटकांत सर्वबाद 200 धावांत रोखला. श्रावण गळफाडेने अर्धशतक करत संघाच्या डावाला आकार दिला. 158 धावा व 1 गडी बाद करणारा प्रणय सिसवाल सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्य फेरी:

क्रिकेट नेक्स्ट अकादमी: 50 षटकांत 8 बाद 330 धावा(प्रणय सिसवाल 158(97,22×4,5×6), कृष्णा पांडे 47(74,5×4), सिद्धांत बाफना 26(25,5×4), दर्शिल वाघेला 4-51, श्रवण गालफाडे 2- 62) वि.वि चंद्रोस: 40 षटकांत सर्वबाद 200 धावा (श्रावण गळफाडे 53(72,7×4), सय्यद जावेद 35(31,6×4), युसूफ मुजावर 25(29,3×4), शौर्य देशमुख 5-26, अर्णव अग्रवाल 2-32, प्रणय सिसवाल 1-28)सामनावीर- प्रणय सिसवाल

क्रिकेट नेक्स्ट अकादमी 130 धावांनी विजयी