May 18, 2024

प्रगल्भ अभिनयाच्या दर्शनाने नृत्यरसिक भारावले

पुणे दि. २६ मे, २०२३ : नृत्याच्या संदर्भात कुठल्याही ‘रचने’ला सामोरे जाताना, त्या रचनेचा सर्वांगीण विचार करा. त्या रचनेचा ध्यास घ्या आणि परिश्रमांचे अर्घ्य देत रहा. एका क्षणी त्या रचनेशी तुमचा ‘संवाद’ सुरू होईल आणि तुम्ही त्या रचनेच्या जादूचा भाग बनून जाल. रसिक आणि जाणकारांना त्यातून अनोखी नृत्यानुभूती मिळेल, असे प्रतिपादन चेन्नई येथील ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना आणि नृत्यगुरू ब्राघाक्का बेसेल यांनी केले.

प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना मेघना साबडे यांच्या ‘नृत्ययात्री’ या संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात ब्राघाक्का बेसेल यांनी ‘एहसास : लॅंडस्केप ऑफ इमोशन्स’ या शीर्षकाखाली भरतनाट्यम नृत्यातील अभिनयाचे दर्शन रसिकांना घडवले. रिद्धी पोतदार यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना आणि नृत्यगुरू डॉ. सुचेता भिडे चापेकर आणि ज्येष्ठ कथक नृत्यांगना आणि नृत्यगुरू शमा भाटे यावेळी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रम टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लीश स्कूलमधील गणेश सभागृह येथे संपन्न झाला.

गुरू कलानिधी नारायणन्, अड्यार के लक्ष्मण, चिदंबरम पी एस कुंचितपादम पिल्लै आणि मांगुडी दुरैराज अय्यर या मान्यवर गुरूंचे मार्गदर्शन लाभलेल्या ब्राघाक्का यांनी ‘सराव करत रहा, तज्ज्ञांकडून रचना समजून घ्या, रचना स्वतःमध्ये मुरवून घ्या, रचनेवर प्रेम करा मग ती उलगडत जाईल, असा नृत्यमंत्र उपस्थितांना दिला.

ब्राघाक्का यांनी आपल्या सादरीकरणाची सुरवात आदी शंकराचार्यांच्या सौंदर्यलहरी मधील ‘नवरसश्लोका’ने केली. त्यानंतर एका तमिळ पदातून त्यांनी अभिसारिका नायिकेचे विभ्रम दाखवले. पाठोपाठ क्षेत्रैय पदातून एकाच वेळी त्यांनी मुग्धा, मध्यमा आणि प्रगल्भा अशा तीन नायिकांची रूपे आविष्कृत केली. प्रोषितभर्तृका नायिका (जिचा प्रियतम दूर देशी गेला आहे अशी) साक्षात मदनाने फेकलेल्या पुष्पबाणांचा कसा सामना करते आणि मदनाशी भांडणे, हे त्यांनी अतिशय मोजक्या हालचाली आणि अभिनयातून दाखवले. त्यांनी सादर केलेल्या कवी जयदेव यांच्या ‘गीतगोविंदम्’ मधील अष्टपदीनेही रसिकांना नृत्यातील अभिनयाचे वेगळे दर्शन घडले. ब्राघाक्का यांनी आपल्या सादरीकरणाची सांगता ‘श्रीकृष्ण कर्णावतम्’ मधील एका सुंदर रचनेद्वारा केली. बालकृष्णाला माता यशोदा रामायणातील प्रसंग सांगत असताना, तिला श्रीकृष्ण हाच श्रीराम आहे याचा बोध होतो, असा कथाशय ब्राघाक्का यांनी तरल, सूक्ष्म भावच्छटा दर्शवून उभा केला.

मेघना साबडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत सर्वांचे स्वागत केले तर स्वरदा भावे यांनी सूत्रसंचालन केले.