May 20, 2024

‘चला जाणूया नदीला’ अभियान जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न इंद्रायणी नदी प्रदुषणाबाबत उपाययोजनांना गती देणार- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे, 03 मे 2023: इंद्रायणी नदी प्रदुषणाबाबतचा विषय प्रशासनाच्यादृष्टीने महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे. या अनुषंगाने लवकरच पिंपरी- चिंचवड महानगर पालिका, पुणे जिल्हा परिषद, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियामक मंडळ यांची संयुक्त बैठक घेऊन उपाययोजनांबाबतच्या कृती आराखड्याला गती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

‘चला जाणूया नदीला’ अभियानासाठी गठीत जिल्हास्तरीय समितीच्या दूरदृष्य प्रणालीद्वारे आयाजित बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख बोलत होते. बैठकीस जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे, जलबिरादरीचे महाराष्ट्र समन्वयक नरेंद्र चूग, नदी प्रहरी विनोद बोधवनकर, डॉ. सुमंत पांडे, शैलजा देशपांडे, अनुजा बाली आदी उपस्थित होते.

इंद्रायणी नदी पात्राच्या परिसराला स्वत: भेट दिली असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, इंद्रायणी नदी प्रदुषणाच्या विषयामध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीदेखील तात्काळ उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत. या उपाययोजनांमध्ये पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेची भूमिका महत्वाची आहे. त्याबरोबरच अन्य विभागांची संयुक्त बैठक घेऊन कृती आराखडा राबविण्याला गती देण्यात येईल.

डॉ. देशमुख पुढे म्हणाले, नद्या या आपला मोठा वारसा असून जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासात नद्यांचे मोठे योगदान आहे. चला जाणूया नदीला अभियानासाठी जिल्हा नियोजन समितीतून लवकरात लवकर निधी वितरणाबाबत कार्यवाही करण्यात येईल. देहू आळंदी विकास आराखडा, स्वच्छ भारत अभियान आदींसोबत हे अभियान कसे जोडता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या अभियानाला तालुका पातळीपर्यंत गतीमान करण्यासाठी उपविभाग स्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुका स्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना दरमहा किमान एक बैठक घेण्याच्या सूचना देण्यात येतील, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

धरणांमध्ये मासेमारीमुळे घटणाऱ्या माशांची संख्या कायम राखण्यासाठी नियमित मत्स्यबीज सोडण्याच्या अनुषंगाने तसेच सर्वंकष मत्स्यविकासाबाबत जलसंपदा विभागाने मत्स्यव्यवसाय विकास विभागासोबत बैठक घेऊन कार्यवाही करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. ‘चला जाणूया नदीला’ या महत्त्वाकांक्षी अभियानात सर्वच शासकीय विभागांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

यावेळी कार्यकारी अभियंता डॉ. पाटील म्हणाले, या अभियानात जिल्ह्यातील ११ नद्यांचा समावेश आहे. जलसंपदा विभागाचे सर्व क्षेत्रीय स्तरावरील शाखा अभियंता आदी क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी, महसूल विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग आदींचे क्षेत्रीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग अभियान यशस्वी करण्यासाठी वाढविण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

जल बिरादरीचे नरेंद्र चूग यांनी या अभियानांतर्गत राज्यात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. श्री. बोधनकर यांनी भिगवन येथील मत्स्यबीज केंद्राच्या उपक्रमाची आणि स्थानिक मच्छिमारांकडून देशी प्रजातीच्या मत्स्यबीज धरणात सोडण्याच्या उपक्रमाची माहिती दिली. डॉ. पांडे, श्रीमती देशपांडे, श्रीमती बाली आदींनी मनोगत व्यक्त केले.