January 20, 2025

माजी नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये खदखद कॅन्टोन्मेंटमध्ये लागले पोस्टर

पुणे, ८ जानेवारी २०२५ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या विरोधात आता खदखद व्यक्त केली जात आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी या विरोधात फ्लेक्स लावून निश्चित केला आहे. शायरीच्या माध्यमातून हे नाराजी व्यक्त केली आहे. तर काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून हा निर्णय योग्य नसल्याचे पक्षनेतृत्वाला सांगितले आहे.

शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनवडे, संगीता ठोसर, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट या पाच नगरसेवकांनी मंगळवारी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे भाजपमधील निष्ठावंत नाराज झाले असून आगामी निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. यावरून भाजपमध्ये खदखद व्यक्त केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर आता नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे वेध लागले आहेत. पण आता पक्षात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू असल्याने सोशल मीडियावर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. यामध्ये
“ज्या कार्यकर्त्यांनी हे झाड जपलं, त्यांच्यावरती महापालिका निवडणुकीला फळ चाखण्याची वेळ आली, तेव्हा इतर पक्षातील लोकांना संधी देण्यात येत असल्याची’ खंत या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय.

मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते विशाल दरेकर यांनी विविध ठिकाणी फ्लेक्स लावलेले आहेत.

दुश्मनी जमकर करो
लेकिन एहसास रहे
कब हम दोस्त बन जाये
तो तो शर्मिंदा ना हो जाये
अशी शायरी करून त्यावरून नाराजी व्यक्त केली आहे.