May 5, 2024

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस दुपारी बारानंतर अवजड वाहनांना प्रवेश

पुणे, २३ डिसेंबर २०२३ : नाताळाच्या सुट्टीमुळे मुंबई पुणे गती मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन महामार्ग पोलिसांनी वाहतुकीची नियोजन केलेले आहे अवजड वाहनांनी आजपासून सोमवार पर्यंत सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत महामार्गाचा वापर करू नये, दुपारी १२ नंतर वापर करावा असे आवाहन करण्यात आलेले आहे. पोलीस महासंचालक रवींद्र कुमार सिंगल यांनी हे आवाहन केले आहे.
नाताळ सणानिमित शनिवार (२३ डिसेंबर), रविवार (२४ डिसेंबर) व सोमवार (२५ डिसेंबर) अशा सलग सुट्ट्या असल्याने व शाळा, महाविद्यालय यांना सुट्टी असल्याने मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कारच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे.

सलग सुट्टी आल्यानंतर घाटामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी घाट सुरू होण्यापूर्वी जड अवजड वाहनांना थांबविण्यात येते व वाहतूक कोंडी संपल्यानंतर जड अवजड वाहने मार्गस्थ करण्यात येतात. मागील वाहतूक कोंडीची परीक्षण केले असता जड अवजड वाहने व कार हे सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत
एकत्र आल्यानंतर वाहतूक कोंडी होते.

तरी सर्व जड अवजड वाहन मालक/चालक संघटना यांना आवाहन करण्यात येते की, वर नमूद दिवशी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवरील प्रवास दुपारी १२ वाजल्यानंतर सुरू केल्यास आपला प्रवास सुरक्षित व सोयस्कर होण्यास मदत होईल. तसेच वाहतूक कोंडीमुळे सदर वाहनांचे क्लच प्लेट जाणे, इंजिनचे काम निघणे इत्यादी टळू शकेल तसेच इंधन व वेळची बचत होईल, असे सिंगल यांनी सांगितले.