May 4, 2024

पुण्यातील सात पोलीस ठाण्यातंर्गत बालस्नेही कक्षाची उभारणी

पुणे, दि. १७/०८/२०२३: पुणे पोलिसांकडून सात पोलीस ठाण्यातंर्गत बालस्नेही कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. समर्थ, मुंढवा, कोंढवा, वानवडी, मार्वेâटयार्ड, बिबवेवाडी आणि हडपसर पोलीस ठाण्यात स्थापन करण्यात आलेल्या बालस्नेही कक्षाचे उद्घाटन पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते मंगळवारी (दि. १५ ) करण्यात आले. कक्षाद्वारे विधीसंघर्षग्रस्त बालकांची काळजी आणि समुपदेशन विविध स्वययंसेवी संस्थांच्या माध्यमातून करुन त्यांचे पुनर्वसन केले जाते.

राज्यातील पहिल्या बालस्नेही कक्षाची स्थापना लष्कर पोलिस ठाण्यात करणात आली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या भरोसा कक्ष आणि होप फोर द चिल्ड्रेन संस्थेच्यावतीने विविध पोलीस ठाण्यातंर्गत बालस्नेही कक्षाची उभारणी करुन अल्पवयीनांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच अनुषंगाने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर समर्थ, मुंढवा, कोंढवा, वानवडी, मार्वेâटयार्ड, बिबवेवाडी आणि हडपसर पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. उद्घाटनाला पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त प्रविणकुमार पाटील, अपर आयुक्त रंजन शर्मा, उपायुक्त संदिपसिंह गिल्ल, एसीपी अश्विनी राख, एसीपी अशोक धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, संगिता जाधव, होप फॉर चिल्ड्रेन फाऊंडेशनच्या कॅरोलीन उपस्थित होते.

२३ पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची उभारणी
होप फॉर दी चिल्ड्रेन फाऊंडेशन स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने पुणे पोलीस आयुक्तालयातील २३ पोलीस ठाण्यामध्ये बालस्नेही कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे विधीसंघर्षग्रस्त बालकांचे समुपदेशन करण्यावर भर दिला जातो. वेगवेगळ्या स्वययंसेवी संस्थांच्या माध्यमातून व्होकेशनल कोर्सेसचे प्रशिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्राधान्य देण्यात येते.

“बालस्नेही कक्षाच्या माध्यमातून बालकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येत आहेत. तसेच, अल्पवयीन मुलांवरील दाखल गुन्ह्याबाबत पोलिसांकडून संबंधिताच्या समुपदेशनावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी सर्व पोलीस ठाण्यामध्ये बाल कल्याण पोलीस अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.” – रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर