May 4, 2024
Pune Municipal Corporation Surgical Strike; A road blocked for thirty years was made in one night

पुणे महापालिकेचे सर्जिकल स्ट्राईक; तीस वर्ष रखडलेला रस्ता केला एका रात्रीत

पुणे, १९ ऑगस्ट २०२३: गेल्या तीस वर्षापासून २०० मीटरचा रस्ता रखडला होता, त्यामुळे मुंढवा चौक ते मुंढवा रेल्वे पूल या दरम्यान रोज प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. नागरिक तक्रारी करून करून मेटाकुटीला आले. पण रस्ता काही केल्या होत नव्हता. अखेर महापालिका प्रशासनाने मनावर घेतले अन् हडपसर-खराडी रस्त्यावरील हा बॉटलनेक एका रात्रीत काढून टाकला. शुक्रवारी रात्री ११ वाजता काम सुरू केल आणि शनिवारी सकाळी ६ वाजता काम पूर्ण केले. त्यामुळे इतरवेळी वेळकाढूपणा करणाऱ्या महापालिकेने या रस्त्याचे एका रात्रीत काम केल्याने कौतूक केले जात आहे.

 

हडपसर खराडी हा विकास आराखड्यातील रस्त्यावर १९९१- ९२ च्या सुमारास या भागातील जमिनींवर शेती झोन होता. त्यामुळे जागा मालकांना कमी मोबदला मिळाला आहे असा त्यांचा आक्षेप होता. त्या कारणाने रस्ता रुंदीकरणात अडथळे निर्माण झाले होते. पण वाहतूक कोंडी होत असल्याने हा रस्ता मोठा करावा यासाठी गेले काही महिने प्रयत्न सुरु होते. यासाठी जागा मालकांच्या बैठका घेऊन त्यांची समजूत काढण्यात आली. पण तरीही रस्त्याचे काम करताना कोणाचाही अडथळा येऊ नये यासाठी प्रशासनाने गुप्तता राखत शुक्रवारी रात्री ११ वाजता काम सुरू केले.

 

यामध्ये पथ विभागासह भूसंपादन, विद्युत, अतिक्रमण निर्मूलन, हडपसर आणि मुंढवा क्षेत्रीय कार्यालय, बांधकाम विभाग यांनी समन्वयाने काम करत आपापली कामे पटापट सुरु करून सकाळी ६ पर्यंत सीमा भिंत पाडणे, टपऱ्या, स्टॉल, पत्र्याचे शेड, पत्रे लावून अडवलेली जागा रिकामी करणे अशी बहुतांश कामे पूर्ण केली. विद्युत विभागाने पथ दिव्यांचे नियोजन केले. यावेळी स्थानिक पोलिसांनी बंदोबस्तही दिला होता. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पथ विभागाचे अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनीही रात्रभर जागेवर थांबून कामे करून घेतली.

 

‘‘हडपसर खराडी २४ मीटर रस्त्यावर मुंढवा चौक ते मुंढवा रेल्वे पूल या भागातील रस्ता गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला होता. त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. महापालिका प्रशासनाने जागा मालकांशी चर्चा करून ही जागा ताब्यात घेऊन एका रात्रीत रस्ता केला. त्यामुळे रस्त्याच्या दोन्हीला १० फूट जास्त जागा उपलब्ध झाली आहे.’’, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.