पुणे, २५ आॅक्टोबर २०२४: कल्याणी नगर येथील पोर्शे कार प्रकरणांमध्ये आमदार सुनील टिंगरे यांनी आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी कापली जाईल अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगलेली होती. अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी जाहीर केली त्यामध्ये सुनील टिंगरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. दरम्यान, या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपचे माजी आमदार जगदीश मुळके इच्छुक आहेत. त्या ठिकाणी आता टिंगरे निवडणूक लढवणार असल्याने मुळी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
महायुतीमध्ये ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार तेथे त्या पक्षाची जागा असणार असल्याचे जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाले. वडगाव शेरी मध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनी भाजपचे जगदीश मुळीक यांचा पराभव केला होता. त्यामुळे ही जागा अजित पवार यांच्याकडे राहणार हे जवळपास निश्चित झालेले होते. मात्र पोर्षे कार प्रकरणात सुनील टिंगरे यांनी आरोपीच्या कुटुंबियांना मदत केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे टिंगरे यांच्या विरोधात संतापाची लाट उसळलेली होती. गेल्या महिन्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वडगाव शेरी येथे घेतलेल्या सभेत देखील टिंगरे यांच्यावर अतिशय कडक शब्दांमध्ये प्रहार केलेला होता. त्यामुळे टिंगरे यांची जागा धोक्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर मुळीक यांनी वडगाव शेरी ची निवडणूक लढवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू केलेली आहे.
जागा वाटपाची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर अजित पवार यांनी टिंगरे यांच्या नावाची घोषणा केलेली नव्हती. त्यामुळे वडगाव शेरी मतदारसंघ भाजपकडे जाणार का अशी शक्यता व चर्चा सुरू झालेली होती. अखेर आज अजित पवार यांनी सात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली त्यामध्ये सुनील टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसापासून मुळीक हे मुंबईमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून वडगाव शेरी मतदारसंघ भाजपकडे घ्यावा यासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्या या प्रयत्नांना अपयश आलेले असून मुळे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता
वडगावशेरीच्या जागेसाठी भाजप आग्रही आहे. पण आता या ठिकाणी अजित पवारांनी अधिकृत उमेदवार जाहीर केलेला आहे. त्यामुळे यांना बंडखोरी करण्यास लावण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून वडगावशेरी येथील जागेवर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. यावेळेस या दोघांपुढे शरद पवारांच्या गटाचे बापू पठारे यांचे आव्हान असणार आहे.
More Stories
पुणेकरांचा बंडखोरांना ठेंगा, ५७ वर्षात एकाचाही विजय नाही
आपल्यातील राजकीय शत्रुत्वाचा सूड महिलांवर काढू नका – देवेंद्र फडणवीसांचा मविआच्या नेत्यांवर टीका
शरद पवारांच्या व्यंगावर बोलल्याने अजित पवार भडकले, सदाभाऊ खोतांना दिला इशारा