पुणे, २५ फेब्रुवारी २०२५ : गुलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांना महापालिकेकडून मागील महिन्यापासून दिली जात असलेली उपचाराच्या खर्चाची आर्थिक मदत दि. १ मार्चपासून बंद केली जाणार आहे.
सिंहगड रस्ता परिसरात नांदेडगाव, किरकटवाडी, नांदोशी, धायरी, डिएसके विश्व परिसरात मागील महिन्यात रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले होते. दूषित पाण्यामुळे हा आजार पसरत असल्याचे समोर आल्याने महापालिकेकडून या भागातील रुग्णांना शहरी गरीब योजनेअंतर्गत रुग्णास २ लाख तर इतर रुग्णांना १ लाखांची मदत देण्यात येत होती. मात्र, या साथीला अटकाव घालण्यासाठी पालिकेकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे या परिसरातील साथ आटोक्यात आल्याने तसेच नवीन बाधित रुग्ण आठवड्यात एखादा सापडत असल्याने उपचारासाठीची मदत बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या शिवाय, या आजाराचे रुग्ण वर्षभर सापडत असल्याने सर्वांनाच मदत देणे शक्य नाही, याबाबतचा प्रस्तावही प्रशासनाकडून ठेवण्यात आला आहे.
३५ रुग्णांना ४९ लाखांची मदत : महापालिकेकडून १४ जानेवारीनंतर या आजाराने बाधित झालेल्या तसेच जीबीएसचा हाॅटस्पाॅट भागातील रुग्णांनाच ही मदत देण्यात येणार होती. या आजारावर पाच ते दहा लाखांचा खर्च असल्याने तसेच प्रामुख्याने दूषित पाण्याने हा झालेला असल्याने महापालिकेने जबाबदारी उचलत हे मदत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, शहरी गरीब योजनेत बसत असलेल्या १२ रुग्णांना २४ लाखांची मदत देण्यात आली तर शहरी गरीब योजनेत बसत नसलेल्या २५ रुग्णांना प्रत्येकी १ लाख रुपयांप्रमाणे २५ लाखांची मदत आतापर्यंत आरोग्य विभागाकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
More Stories
पुणे मेट्रोचे खडकी स्थानक उद्यापासून प्रवासी सेवेत
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पुण्याकडे प्रस्थान; हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिरसात न्हालं वातावरण
‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे -विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार