February 23, 2024

वाघोली परिसरातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी

पुणे, दि. २८ फेब्रुवारी २०२२: वाघोली व परिसरातील वीजग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी वाघोली येथे नवीन २२०/२२ केव्ही क्षमतेचे अतिउच्चदाब उपकेंद्र महावितरणकडून प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या उपकेंद्रासाठी गेल्या दोन वर्षांपासून वाघोली येथे जागेचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे. केवळ जागेअभावी या उपकेंद्राचे काम सध्या रखडलेले आहे. दरम्यान महावितरणकडून २२/११ केव्ही गेरा उपकेंद्र व एडब्लूएचओ स्विचिंग स्टेशन लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी तांत्रिक कामे वेगाने सुरु आहेत. त्याचा सुमारे २८ हजार वीजग्राहकांना फायदा होणार आहे.

वाघोली परिसरात सर्व वर्गवारीतील महावितरणचे एकूण ७३ हजार वीजग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांना २२ केव्ही आयव्ही इस्टेट, गंगावाटिका, रोहन अभिलाषा व पूर्वरंग या २२ केव्ही स्विचिंग स्टेशन्मधून वीजपुरवठा केला जातो. या चारही स्विचिंग स्टेशन्सला महापारेषणच्या लोणीकंद ४००/२२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो. मात्र वीजपुरवठा करणाऱ्या सर्व वीजवाहिन्यांची सरासरी लांबी १५ ते १६ किलोमीटर आहे. त्यामुळे विविध कारणांमुळे सुरळीत वीजपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होत आहेत.

वाघोलीमध्ये नवीन अतिउच्चदाब उपकेंद्राची गरज- महापारेषणच्या लोणीकंद अतिउच्चदाब उपकेंद्रातील वीजभाराची क्षमता ही ९० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे वाघोली परिसरातील विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी व सर्व वर्गवारीच्या नवीन वीजजोडण्या देण्यासाठी महावितरणकडून वाघोली येथे नवीन २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब प्रस्तावित करण्यात आले आहे. तथापि केवळ जागेअभावी या उपकेंद्राचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले आहे. वाघोली अतिउच्चदाब उपकेंद्र उभारल्यास तब्बल १२ उपकेंद्र व स्विचिंग स्टेशन्सला तसेच ३३ व २२ केव्ही क्षमतेच्या १९ वाहिन्यांना या उपकेंद्रातून वीजपुरवठा होणार आहे. त्यामुळे वाघोली परिसरच नव्हे तर नगररोड व मुळशी विभागातील सुमारे दीड लाख ग्राहकांना दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठ्याचा फायदा होणार आहे. तसेच पर्यायी स्वरुपाच्या वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकणार आहे.

वाघोलीसाठी दोन नवीन उपकेंद्र लवकरच– वाघोलीमधील वीजग्राहकांसाठी २२/११ केव्ही क्षमतेचे गेरा उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. त्याची उभारणी सुरु असून या उपकेंद्राला १३२/२२ केव्ही खराडी व २२/२२ केव्ही मार्व्हल झफायर स्विचिंग स्टेशनमधून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. येत्या ६ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होईल. या उपकेंद्रामुळे उबाळेनगर, चोखीदाणी परिसर, बायफ रस्ता, बायफ कंपनी परिसर, प्रियांकानगरी, रेणुका पार्क, खांदवेनगर, अनसूया पार्क आदी परिसरातील २० हजार वीजग्राहकांना फायदा होणार आहे. तसेच महावितरणकडून AWHO (आर्मी वेलफेअर हाऊसिंग ऑर्गनायझेशन) २२ केव्ही स्विचिंग स्टेशनची उभारणी पूर्ण झाली आहे. या उपकेंद्राला लोणीकंद अतिउच्चदाब उपकेंद्रातून दोन नवीन २२ केव्ही भूमिगत वीजवाहिन्यांद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. १६ किलोमीटर लांबीच्या या वीजवाहिन्यांचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे लोहगाव रस्ता, जाधववस्ती, गोरेवस्ती, बहिरटवस्ती, सुयोगनगर, वाघोली गावठाण, भावडी रस्ता या परिसरातील १८ हजार वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्याचा फायदा होणार आहे.

सिमेंट रस्त्यामुळे वीजयंत्रणेच्या दुरुस्तीला विलंब- रविवारी (दि. २६) वाघोली परिसरात एकामागे एक तीन वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यामुळे महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी रात्रभर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे अथक परीश्रम केले. यात फक्त साईसत्यम २२ केव्ही वीजवाहिनीला पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा करणे शक्य झाले नाही. परिणामी ९ हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा बंद राहिला. यासाठी सिमेंट काँक्रीटकरणाचा रस्ता कारणीभूत ठरल्याचे दिसून आले आहे. अतिरिक्त स्वरुपात असलेल्या २२ केव्ही करोला-२ वाहिनीद्वारे साईसत्यम वाहिनीला पर्यायी वीजपुरवठ्याची सोय आहे. मात्र ही वाहिनी पूर्वरंग सोसायटीजवळ सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याखाली गेल्याचे दिसून आले. जेसीबी व ब्रेकरने सिमेंट रस्त्याचे खोदकाम केल्यानंतर सोमवारी (दि. २७) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास करोला-२ वाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्यापूर्वीच वाघोली वीजवाहिनीवरून साईसत्यम वाहिनीवरचा वीजपुरवठा सोमवारी सकाळी ८ वाजता टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला.