May 4, 2024

पीएमआर ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सुमित नागलची विजयी सलामी

पुणे, 28 फेब्रुवारी 2023: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित पीएमआर ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत भारताच्या वाईल्डकार्ड द्वारे प्रवेश केलेल्या सुमित नागलने जपानच्या यासुताका उचियामाचा पारभव करत शानदार सुरुवात केली. तर, पुण्याच्या अर्जुन कढेला ऑस्ट्रियाच्या मॅक्सिमिलियन न्यूच्रिस्टकडून पराभवाचा सामना करावा लागला.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताच्या व जागतिक क्रमवारीत 387व्या स्थानी असलेल्या सुमित नागलने जापनच्या जागतिक क्र. 284 असलेल्या यासुताका उचियामाचा टायब्रेकमध्ये 7-6(3), 4-6, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करत दुस-या फेरीत धडक मारली. हा सामना 2 तास 37 मिनीट चालला. पहिल्या सेटमध्ये बाराव्या गेम पर्यंत दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सामन्यात 6-6 अशी बरोबरी निर्माण झाली. टायब्रेकमध्ये सुमितने वरचढ खेळ करत सुरूवातीलाच भक्कम आघाडी मिळवली व हा सेट जिंकून सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या यासुताकाने पहिल्याच गोममध्ये सुमितची सर्व्हिस ब्रेक केली. या सेटमध्ये यासुताकाने वर्चस्व राखत सुमितविरुद्ध हा सेट 6-4 असा जिंकून आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये सुमित याने दुसऱ्या सेटची पुनरावृती न करता हा सेट यासुताकाविरुद्ध 6-4 असा जिंकून विजय मिळवला. विजया नंतर सुमित म्हणाला यासुताका हाही इथे जिंकण्यसाठीच आला होता, त्याने माझी कमजोरी आळखून खेळण्याचा प्रयत्न केला मात्र मी त्याच्यावर दबाव निर्माण करण्यात यशस्वी ठरलो आणि सामना जिंकला.

ऑस्ट्रेलीयाच्या जागतिक क्रमांक 128 असलेल्या अव्वल मानांकीत जेम्स डकवर्थ याच्याकडून भारताच्या प्रजनेश गुन्नेश्वरणला 7-6(5), 2-6, 3-6 असा तर
अर्जुन कढे याला ऑस्ट्रियाच्या मॅक्सिमिलियन न्यूच्रिस्ट याच्याकडून 2-6, 5-7 असा पराभव पत्करावा लागला.

पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या चेक प्रजासत्ताकच्या जागतिक क्रमांक 412 असलेल्या डोमिनिक पालान याने आपला सहकारी जागतिक क्रमांक 181 असलेल्या सहाव्या मानांकीत डॅलीबोर एसव्हीआरसीनाचा 6-4,7-6(4) असा पराभव करत अनपेक्षित निकालाची नोंद केली. हा सामना 2तास 3मिनीट चालला. इटलीच्या व जागतिक क्रमांक 158 असलेल्या ल्युका नार्डी याने झिम्बाब्वेच्या जागतिक क्रमांक 186 असलेल्या बेंजामिन लॉक याचा 6-1, 7-5 असा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला. 3तास 17 मिनीट चाललेल्या संघर्षपूर्ण लढतीत बल्गेरीयाच्या दिमितार कुझमानोव्ह याने जपानच्या मकोटो ओची याचा 5-7, 7-6(1), 6-2 असा पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला. एकतर्फी लढतीत ऑस्ट्रेलीयाच्या डेन स्वीनी याने ग्रेट ब्रिटनच्या जय क्लार्क याचा 6-0, 6-2 असा सहज पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचे उद्घाटन पीएमआरडीए कमिशनर राहूल रंजन महीवाल व चॅलेंजर पर्यवेक्षक आंद्रेई कॉर्निलोव्ह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे मानद सचिव आणि स्पर्धेचे संचालक सुंदर अय्यर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- मुख्य ड्रॉ- पहिली फेरी- एकेरी गट
जेम्स डकवर्थ (ऑस्ट्रेलीया)(1) वि.वि प्राजनेश गुन्नेस्वरन (भारत) 6-7(5), 6-2, 6-3
डोमिनिक पालान (चेक प्रजासत्ताक) वि.वि डॅलीबोर एसव्हीआरसीना (चेक प्रजासत्ताक) (6) 6-4,7-6(4)
ल्युका नार्डी (इटली) (4)वि.वि बेंजामिन लॉक ( झिम्बाब्वे ) 6-1, 7-5
सुमित नागल ( भारत) वि.वि यासुताका उचियामा (जपान) 7-6(3), 4-6, 6-4
मॅक्सिमिलियन न्यूच्रिस्ट (ऑस्ट्रिया) वि.वि अर्जुन कढे ( भारत ) 6-2, 7-5
लॉरेन्झो जियस्टिनो (इटली)वि.वि नाम होआंग लाय (विएतनाम) 6-1, 6-1
निकोला मिलोजेव्हिक (सर्बिया)वि.वि फ्रेडरिको फेरेरा सिल्वा (पोर्तुगाल) 6-7(1), 7-6(5), 6-4
हमद मेडजेदोव्हिक (सर्बिया) वि.वि हिरोकी मोरिया (जपान) 6-3, 6-4
दिमितार कुझमानोव्ह (बल्गेरीया) वि.वि मकोटो ओची (जपान) 5-7, 7-6(1), 6-2
डेन स्वीनी (ऑस्ट्रेलीया) वि.वि जय क्लार्क (ग्रेट ब्रिटन) 6-0, 6-2