July 27, 2024

माजी आमदार विश्वासराव गांगुर्डे यांचे निधन

पुणे, १६ मे २०२४ : भाजपचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे.

विश्वासरावांचे वडील कृष्णराव गांगुर्डे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अतिशय जवळचे स्नेही होते. त्यामुळे विश्वासरावांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सहवास लाभला. १९७८ मध्ये दत्तवाडी- राजेंद्रनगरमधून ते पहिल्यांदा पुणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर १९९२-१९९७ काळात गणेशखिंड भागातून नगरसेवक पद भुषविले.

विश्वासराव हे विचारवंत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ते नेहमीच पुरस्कर्ते होते. त्यामुळे इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यानंतर आणीबाणी विरोधात त्यांनी मोठा संघर्ष उभा केला. १९९२-१९९५ या काळात ते पुण्याचे शहराध्यक्ष होते. भाजपा शहराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्षाचे काम पुणे शहरात तळागाळापर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले.

१९८०-८५ आणि १९८५-९० दोनवेळा पर्वती विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र दुर्दैवाने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, १९९९ मध्ये ते पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. या काळात त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडविले.