पुणे, २६ एप्रिल २०२५:पुणे-नगर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शासनाने महापालिकेच्या हद्दीत फिनिक्स मॉल ते खराडी दरम्यान दुमजली उड्डाणपूल बांधण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे या चौकात होणारी वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. या बाबतचे आदेश राज्य शासनाने शुक्रवारी (दि २५) काढले आहेत. मात्र या उड्डाणपुलाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी वडगावशेरीचे विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे आणि माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यामध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे.
पुणे अहिल्या नगर मार्गावर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उन्नत महामार्ग(एलिव्हेटेड) मार्ग उभारण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. राज्य पायाभूत विकास महामंडळातर्फे (एमएसआयडी) फिनिक्स मॉल ते खराडी बायपासच्या असा सुमारे चार किलोमीटरचा मार्ग उन्नत महामार्गातून वगळण्यात आला होता. त्यामुळे हा मार्ग फिनिक्स चौकातूनच करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती.
सुरवातीला हा मार्ग एनएचएआय मार्फत करण्यात येणार होता. पुणे ते शिरूर असा ५६ किलोमीटर लांबीचा हा मार्ग प्रस्तावित होता. या साठी साडेसात हजार कोटी रुपयांच्या खर्च देखील अपेक्षित होता. मात्र, राज्य सरकारने वेगाने रस्त्यांचा विकास करण्यासाठी गेल्या वर्षी ‘एमएसआयडी’ सी स्थापना केली. यामुळे या मार्गाचे काम हे एमएसआयडीला देण्यात आले. दरम्यान, पालिकेमार्फत खराडी बायपास चौकातून उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटर बांधण्याचे ठरले. मात्र, या मार्गावरील विकास कामे ही एनएचआयए’च्या कामांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, हे काम एमएसआयडीला दिल्यावर या मार्गाचे काम हे उन्नत महामार्गातून वगळण्यात आले होते. त्यामुळे हा मार्ग पुन्हा या कामात अंतर्भूत करण्यात यावा अशी मागणी स्थानिकांनी केली होती.
यासाठी सुनील टिंगरे यांनी आमदार असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आमदार बाप पठारे यांनीही यासाठी पत्रव्यवहार केला होता.
नागरिकांच्या मागणीचा विचार करून फिनिक्स मॉल ते खराडी पर्यंत रस्त्याचे काम उन्नत मार्गात समाविष्ट करण्यात आले असून येथे एलिव्हेटेड पूल तयार करण्यात येणार आहे.
कर आकारणी करण्याचे देखील आदेश
पुणे ते शिरुर, अहमदनगर ते देवगड या महामार्गाच्या आधुनिकीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सन २००८ च्या पथकर धोरणानुसार सर्व प्रकारच्या वाहनांवर पथकर आकारणी करण्यात यावी, असे देखील आदेश शासनाने दिले आहेत.
“अहिल्यानगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी एमएसआयडीकडून होणारा वाघोली ते शिरूर हा दुमजली उड्डाणपूल विमाननगर फिनिक्स मॉल पासून व्हावा अशी मागणी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बाबत आदेश दिले. त्यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.”
– सुनिल टिंगरे, माजी आमदार, वडगाव शेरी.
‘‘पुणे ते शिरूर’ या प्रस्तावित उन्नत पुलामधून वडगावशेरी मतदारसंघातील ‘फिनिक्स मॉल ते खराडी जकात नाका’ हा महत्त्वाचा पाच किलोमीटरचा भाग वगळण्यात आला होता. वाढती वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांचा विचार करून फिनिक्स मॉल ते खराडी जकात नाका या वगळलेल्या भागाचा पुन्हा समावेश करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेवून वगळलेला भाग समाविष्ठ करून घेण्याची मागणी केली.
या निर्णयामुळे पुणे नगर रस्त्यावरील वडगावशेरी मतदारसंघातील वाहतूक कोंडी दूर होणार असून संपूर्ण ‘फिनिक्स मॉल ते शिरूर’ मार्ग सुसंगत आणि उच्च दर्जाचा होणार आहे. ”
– बापू पठारे, आमदार, वडगाव शेरी
More Stories
पुणे: वाघोलीत बर्निंग कारचा थरार; सुदैवाने जीवितहानी टळली
पुणे वाहतूक पोलीस अकॅडमीत १००% अधिकारी-अंमलदारांना प्रशिक्षण; १८ सत्रांत मान्यताप्राप्त तज्ज्ञांचे मार्गदर्शन
पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे संवर्धन व पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करू -सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार