December 14, 2024

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची शिवसृष्टीला भेट

पुणे, दि. २७ जून, २०२३ : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या पुणे भेटी दरम्यान पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने न-हे – आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’ला आवर्जून भेट दिली. ‘शिवसृष्टी’तील सरकारवाड्यात उभ्या केलेल्या ऐतिहासिक थिम पार्कच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन ही शिवसृष्टी आता नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास विविध प्रसंगातून आणि दुर्गदर्शनाच्या माध्यमातून पाहता येत असल्याचा आनंद डॉ सावंत यांनी या वेळी व्यक्त केला.

महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश, विनीत कुबेर, अरविंदराव खळदकर, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

गोव्यात सप्तकोटीश्वराचा जीर्णोद्धार करून छत्रपतींच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचे भाग्य गोव्याचा मुख्यमंत्री म्हणून मला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो, अशा भावना डॉ सावंत यांनी व्यक्त केल्या.

नवले पुलापासून कात्रजकडे जाणाऱ्या पुणे बंगलोर बाह्यवळण मार्गावर कात्रजकडे वळताच ‘शिवसृष्टी’कडे आपला प्रवास सुरू आहे असे दर्शविणारे रस्त्याचे सुशोभिकरण व्हावे यासाठी वास्तुविशारद यांकडून रचना मागविण्यात येत आहेत. महापालिकेच्या मान्यतेनंतर त्याची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी येणारा खर्च आणि त्याची देखरेख करण्याची जबाबदारी गारवे ग्रुपच्या किशोर गारवे यांनी स्वीकारली आहे. यावेळी किशोर गारवे यांचा सत्कार डॉ. प्रमोद सावंत यांचे हस्ते करण्यात आला.