May 14, 2025

‘हिरकणी रन’, वुमेन्स हाफ मॅरेथॉनचे साई जनसेवा प्रतिष्ठानतर्फे आयोजन

पुणे, 03/04/2025: साई जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने येत्या रविवारी (ता. ६) ‘हिरकणी रन’, वुमेन्स हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसह हजारो महिला अनाथ व दिव्यांग मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, स्वतःसाठी व समाजासाठी धावणार आहेत, अशी माहिती साई जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व संयोजक सुरज लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी साई जनसेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा गीता मोहोरकर, निशा पाचंगे, स्मिता भिसे, विपुल शर्मा आदी उपस्थित होते.

सुरज लोखंडे म्हणाले, “राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते सकाळी ५.३० वाजता मॅरेथॉनचे उद्घाटन होईल. बाबुराव सणस मैदान, सारसबागपासून मॅरेथॉनला सुरुवात होईल. तीन, पाच, दहा आणि २१ किलोमीटर अशा चार प्रकारात ही मॅरेथॉन होणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, डायटिशियन सलोनी घुगे या मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे, मलाबार गोल्ड अँड डायमंडच्या व्यवस्थापिका दीक्षा देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.”

“मॅरेथॉनमध्ये सहभागी प्रत्येक महिलेला प्रमाणपत्र, मेडल, टीशर्ट दिला जाणार आहे. तसेच विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. २१ किलोमीटर प्रकारात अनुक्रमे १५ हजार, १० हजार व ७ हजार, १० किलोमीटर प्रकारात ११ हजार, ८ हजार व ५ हजार, तर पाच किलोमीटर प्रकारात ७ हजार, ५ हजार व ३ हजार अशी पारितोषिके देण्यात येतील,” असे गीता मोहोरकर यांनी सांगितले. या मॅरेथॉनमधु उभा राहणाऱ्या निधीचा विनियोग अनाथ व दिव्यांग मुलांच्या संस्थांसाठी करण्यात येणार असल्याचेही मोहोरकर यांनी सांगितले.
——————–
असा असेल मॅरेथॉन मार्ग
१) तीन किमी: सणस मैदान, निलायम चौक, दांडेकर पूल, मांगीरबाबा चौक-सणस मैदान
२) पाच किमी: सणस मैदान, दांडेकर पूल, दत्तवाडी, म्हात्रे पूल, सेनादत्त
पोलीस चौकी, मांगीरबाबा चौक-सणस मैदान
३) दहा किमी: सणस मैदान, दांडेकर पूल, राजाराम पूल, संतोष हॉल चौक,
पुन्हा वळून दांडेकर पूल, सारसबाग, बाजीराव रोड, सणस मैदान
४) २१ किमी: सणस मैदान, दांडेकर पूल, राजाराम पूल, संतोष हॉल चौक, पुन्हा वळून राजाराम पूल, दांडेकर पूल, सिंहगड रोड, सारसबाग, बाजीराव रोड, सणस मैदान
——————–
अशी आहे तयारी
– साहाय्यासाठी ७५ स्वयंसेवकांची टीम
– कार्डियाक ऍम्ब्युलन्स व मेडिकल टीम
– पोलीस प्रशासन व पालिका प्रशासनाचे सहकार्य
– नाश्ता, एनर्जी ड्रिंक व पाण्याची सोय