September 20, 2025

तरुणांच्या अचानक हृदयविकार मृत्यूचे कारण कोविड लस नसल्याचे आयसीएमआर- एआयआयएमएसच्या अहवालातून स्पष्ट

नवी दिल्ली/पुणे, २ जुलै २०२५ : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एआयआयएमएस ) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांनी केलेल्या व्यापक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे की, कोविड-१९ लसीकरणामुळे तरुणांमध्ये अचानक हृदयविकाराचे मृत्यू घडत असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या अभ्यासाच्या निष्कर्षांचा हवाला देत, “कोविड लसीकरणामुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढल्याचे आढळले नाही,” असे स्पष्ट केले आहे.

मे ते ऑगस्ट २०२३ दरम्यान १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ४७ रुग्णालयांमध्ये हा अभ्यास करण्यात आला. ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२३ या कालावधीत पूर्णपणे निरोगी असलेल्या तरुणांच्या अचानक मृत्यूचे विश्लेषण या अभ्यासात करण्यात आले. यातून कोविड लसीकरण आणि अचानक हृदयविकाराचा झटका यांच्यात कोणताही थेट संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.

हा अहवाल अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काही दिवसांपूर्वी कोविड लसीच्या तातडीच्या मंजुरीमुळे तरुणांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले असावे, असे विधान करत संभाव्य दुष्परिणाम तपासण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती.

देशभरात तरुणांमध्ये अचानक मृत्यूच्या घटना वाढल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीला उत्तर देण्यासाठी हा अभ्यास महत्त्वाचा ठरला आहे. आयसीएमआर आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र यांच्यातर्फे अशा मृत्यूमागील इतर कारणांचेही संशोधन सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. अभ्यासात, जीवनशैलीशी संबंधित घटक आणि आधीपासूनच्या आजारांमुळेच अशी मृत्यूची प्रकरणे घडत असल्याचे दिसून आले आहे.