January 20, 2025

पर्यावरण टिकले तर आपण टिकू: खा. मेधा कुलकर्णी

पुणे, ०९/०१/२०२५: ‘जीविधा’ या पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीच्या क्षेत्रात कार्यरत संस्थेच्या वतीने आयोजित ‘निर्मिती भारतभूमीची’ या प्रदर्शनाचे उदघाटन राज्यसभा खासदार डॉ.मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते ९ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता झाले.

भूविज्ञान,भूगोल आणि जैवविविधता बाबत योगदान देणाऱ्या डॉ.श्रीकांत कार्लेकर, डाॅ.संजीव नलावडे, प्रा.इरावती नलावडे यांचा उदघाटन कार्यक्रमात खा.डॉ.मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दि.९ ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान बालगंधर्व कलादालन(शिवाजीनगर) येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ‘जीविधा’ च्या वतीने अध्यक्ष राजीव पंडित यांनी स्वागत केले. सौ.वृंदा पंडित यांनी प्रास्ताविक केले.

डॉ.मेधा कुलकर्णी म्हणाल्या,’जीविधा ‘ चे हे प्रदर्शन उपयुक्त, अभ्यासपूर्ण आहे.त्यातून सर्वांना प्रेरणा आणि दृष्टी मिळेल. पर्यावरण टिकले तर आपण टिकणार आहोत.रस्ता महत्वाचा की टेकडी महत्वाची, हे आपल्याला कळले पाहिजे. लहानपणापासून पर्यावरणाची शिकवण मिळाली पाहिजे. पृथ्वी बद्दल जाणून घेण्यासाठी अशा प्रदर्शनाचा उपयोग होणार आहे.शाळांमधून आपण अशी प्रदर्शन भरवली पाहिजेत. पुण्यात ९०० हून अधिक हेक्टर जैवविविधता पार्क आरक्षण आहे,ते जपले पाहिजे.

‘शांतता,वृक्ष शोधायला शहराबाहेर जावे लागत आहे. म्हणून टेकडीफोड थांबवली पाहिजे.. मोठ्या आवाजात सण साजरे करण्याची सवय आपल्याला लागली आहेत. पक्ष्यांना त्रास होऊ नये, म्हणून रात्री आवाज करू नये,असे सांगीतले तर अनेकांना ते कळत नाही. निसर्गाची हानी करणे टाळले पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतून शिकले पाहिजे’, असेही खा. कुलकर्णी यांनी सांगितले.

डॉ.श्रीकांत कार्लेकर म्हणाले,’शालेय वयात भूगोल सारख्या विषयात रुची निर्माण केली पाहिजे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहायला,अनुभवायला मिळाले पाहिजे. सहलीतून असे हेतू साध्य केले पाहिजेत.भू -वारसा जपला पाहिजे.या विषयाचे क्लब सुरु झाले पाहिजेत’.

उंची,तपमान,पर्जन्यमान यात प्रचंड विविधता असणाऱ्या भारतभूमीच्या निर्मितीचा प्रवास भित्तीपत्रक स्वरूपात या प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. याशिवाय महत्वाच्या भूवैज्ञानिक घटनांचे प्रारूपे (माॅडेल्स) व नकाशे ठेवण्यात आले आहेत. यासोबत ‘माय अर्थ मिनरल्स’यांच्यातर्फे भारतात आढळणारे खडक, खनिजे व फाॅसिल्स यांचा संग्रह याच प्रदर्शनात ठेवला आहे. प्रदर्शनाचा मुख्य हेतू भूविज्ञान, भूगोल यामुळे जैवविविधता निर्माण करणे आणि या तीनही बाबींची जपणूक करणे ,ही आपली जबाबदारी आहे ,याबाबत जनजागृती करणे, हा आहे.सकाळी ११ ते रात्री ८ या वेळात हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले आहे.

भूविज्ञान, भूगोल आणि जैवविविधता बाबत चे कार्य ताकदीने पुढे नेणाऱ्या डाॅ.श्रीकांत गबाले, हार्दिक संकलेचा व सौनीत सिसोळकर या तरुण संशोधकांना ‘ यंग अचिव्हर’ पुरस्काराने शनिवार,दि.११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सन्मानित करण्यात येणार आहे.