पुणे, ९ जानेवारी २०२५ : भिडे पूल ते रजपूत वसाहत हा नदीपात्रातील रस्ता नव्याने करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या कामासाठी सव्वा कोटी रूपयांचा निधी मान्य केला आहे. मात्र या कामासाठीचा करारनामा संबधित ठेकेदाराबरोबर अद्यापही करण्यात न आल्याने या रस्त्याची तात्पुरती डागडूजी करण्याचा निर्णय महापालिकेच्या पथ विभागाने घेतला आहे. त्यानुसार या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम पुढील काही दिवसात नव्याने केले जाणार असतानाही पथ विभागाने ‘सतर्कता’ दाखवित काम सुरु केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नदीपात्रातल्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असल्याने हा संपूर्ण रस्ता नव्यानेच तयार करण्याचा निर्णय महापालिकेच्या पथ विभागाने घेतला आहे. एरंडवणे येथील रजपूत वस्ती ते बाबा भिडे पूल या दरम्यानच्या रस्त्याचे काम करण्यासाठी महापालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी एक कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून या कामासाठी निविदा प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली आहे. या कामासाठी संबधित ठेकेदाराबरोबर करारनामा झाल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे. मात्र पथ विभागाने त्याचा करारनामा केलेला नसल्याने हे काम रखडले आहे.
पुढील काही दिवसांमध्ये हे काम सुरु होण्याची शक्यता असतानाच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम अचानकपणे सुरु करण्यात आले आहे. हा संपूर्ण रस्ता नव्याने तयार केला जाणार असताना केवळ डांबरीकरण करुन तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावर डागडूजी का करण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत पथ विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी वाहनचालकांकडून केला जात होत्या त्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम सुरु करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
ठेकादाराबरोबर करारनामा झाल्यानंतर हा संपूर्ण रस्ता नव्याने तयार केला जाणार आहे. या रस्त्याचा वापर दररोज लाखो वाहनचालक ये-जा करण्यासाठी करतात. नदीपात्रातील हा रस्ता एक किलोमीटर लांबीचा आहे. कोथरूड, कर्वे रस्ता, कर्वेनगर, वारजे माळवाडी, शिवणे, खडकवासला, धायरी, नऱ्हे, हिंगणे, आनंदनगर तसेच सिंहगड रस्त्यावरील नागरिकांना मध्यवर्ती पेठांच्या भागामध्ये तसेत शिवाजीनगर, नगर रस्त्याला जायचे असेल तर हा नदीपात्रातील रस्त्याचा वापर दुचाकीस्वारांकडून केला जातो. पावसाळ्याचे दोन ते अडीच महिने वगळता हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असतो. त्यामुळे हा रस्ता तयार करताना पुढील काही वर्षे त्यावर खड्डे पडणार नाही, याची खबरदारी घेणार असल्याचे पथ विभागाने यापूर्वीत जाहीर केले आहे. पुढील काही दिवसात हे काम सुरु होणार असतानाच या रस्त्यावरील खडी, डांबर टाकून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविण्याचे काम पथ विभागाने सुरु केले असल्याचे समोर आले आहे. पथ विभागाने एवढी तत्परता का दाखविली असा प्रश्न विचारला जात आहे.
“नदीपात्रातील संपूर्ण रस्ता नव्याने केला जाणार आहे. त्यासाठी हा रस्ता काही दिवस बंद देखील ठेवला जाणार आहे. ठेकेदाराबरोबर अद्याप करारनामा झालेला नसल्याने काम सुरु करता येत नाही. या रस्त्यावर खड्डे पडल्याच्या तक्रारी आल्याने खड्डे बुजविण्याचे काम सुरु करणायात आले आहे.”
– साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता, पुणे महापालिका
More Stories
देवयानी पवार करणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथे होणाऱ्या वार्षिक बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व
अचूक बिलिंगसाठी सदोष, नादुरुस्त मीटर तातडीने बदला: महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र यांचे निर्देश
सिंबायोसिस तर्फे “सिम-इमर्ज २०२५” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन