January 20, 2025

माध्यमे व मनोरंजन क्षेत्र देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात अधिक योगदान देऊ शकतात

पुणे, दि. १० जानेवारी, २०२५ : भारतातील माध्यमे आणि मनोरंजन उद्योग क्षेत्राचे देशाच्या सकाळ राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान हे जवळपास १% इतके असून नजीकच्या भविष्यात योग्य पाऊले उचलल्यास आणि योग्य धोरणांची अंमलबजावणी केल्यास हे योगदान वाढविण्यात आपण निश्चितच यश मिळवू शकू, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.

गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेत संपन्न होत असलेल्या दुसऱ्या पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी ‘एंटरटेन्मेंट अॅज अॅन इकोनॉमिक इंजिन’ या विषयावरील चर्चासत्रात तज्ज्ञांनी आपली ही मते मांडली. यावेळी रिलायन्स एंटरटेन्मेंट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिबाशिष सरकार, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्याधिकारी असलेले कौस्तुभ धावसे आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित हे मान्यवर यावेळी या चर्चासत्रात सहभागी झाले होते. अभिनेते आरोह वेलणकर यांनी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला.

नजीकच्या भविष्याच्या दृष्टीने सामाजिक क्षेत्रातील धोरणात्मक विषयांवर (पब्लिक पॉलिसी) पुणे शहरात विचारविनिमय व्हावा, या उद्देशाने शहरातील युवा तज्ज्ञ व उद्योजकांनी एकत्र येत या दोन दिवसीय पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिव्हलचे आयोजन केले असून ‘नजीकच्या भविष्यात भारताची १० ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेविषयक कल्पना’ ही या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

‘एंटरटेन्मेंट अॅज अॅन इकोनॉमिक इंजिन’ या चर्चात्मक कार्यक्रमाच्या सुरुवातीला बोलताना आरोह वेलणकर म्हणाले, “देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात मनोरंजन क्षेत्राचे योगदान हे कमी असले तरी आज जगभरातील २ अब्ज पेक्षा जास्त लोकांपर्यंत या क्षेत्राची व्याप्ती पोहोचली आहे हे आपण विसरता कामा नये. या क्षेत्रात वाढ झाल्यास पर्यायाने देशाच्या विकासाला देखील चालना मिळेल हे लक्षात घ्यावे लागेल.”

यावेळी बोलताना शिबाशिष सरकार म्हणाले, “कोविडपूर्वी जवळजवळ मागील ३० वर्षांपासून माध्यमे व मनोरंजन उद्योग क्षेत्राची वाढ ही कायम देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या दरवाढीच्या दुप्पट होत आली आहे. कोविडनंतर यामध्ये घात झाली. या क्षेत्राला आजवर फक्त खाजगी क्षेत्राकडूनच निधी मिळतो. मागील १०० वर्षे टिकून असलेले हे क्षेत्र तोट्याचे आहे हा गैरसमज दूर करण्यासाठी आपण काम करणे गरजेचे आहे. इतर देशांशी तुलना केल्यास अमेरिका आणि चीन या देशांतील मनोरंजन क्षेत्राचे योगदान हे त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्यापेक्षा काही पट जास्त आहे हे ही लक्षात घ्यायला हवे.”

आज माध्यमे व मनोरंजन क्षेत्राच्या वाढीसाठी आवश्यक अशा धोरणांची आवश्यकता असून याद्वारे संस्थात्मक निधी उभारणी, संबंधित पायाभूत सुविधांची उभारणी, कुशल मनुष्यबळ निर्माण करणे यांमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. याबरोबरच मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरीचा (फिल्मसिटी) अधिक क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी व आधुनिकीकरण करण्यासाठी आखण्यात आलेली ३ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना देखील लवकरात लवकर सुरु करायला हवी असे मत सरकार यांनी मांडले. आज देशातील प्रमुख महानगरांमध्ये मुबलक प्रमाणात चित्रपटगृहे असल्याने नजीकच्या भविष्यात निम शहरी भागांत मल्टी स्क्रीन चित्रपटगृहांची उभारणी व्हायला हवी, याकडे सरकार यांनी लक्ष वेधले.

राज्याचे मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री हे राज्यातील माध्यमे व आणि मनोरंजन क्षेत्राकडे आवश्यक लक्ष देतील असा विश्वास यावेळी बोलताना कौस्तुभ धावसे यांनी व्यक्त केला. भारतीय मनोरंजन क्षेत्रामध्ये मोठी क्षमता असून येत्या काही वर्षात समोर येत असलेल्या नवनवीन कल्पनांना धोरणांची जोड मिळाल्यास मनोरंजन क्षेत्रावर याचा सकारात्मक परिणाम होईल असे सांगत कौस्तुभ धावसे पुढे म्हणाले, “मनोरंजन क्षेत्र आणि सरकारी यंत्रणा यामध्ये खुला संवाद आवश्यक असून यामध्ये सरकारचा सहभाग हा महत्त्वपूर्ण ठरेल. मनोरंजन क्षेत्राला आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा देण्यास सरकार कायमच तयार असून मनोरंजन क्षेत्राने आपल्या गरजा आमच्या पर्यंत पोहोचवाव्यात.” दादासाहेब फाळके चित्रनगरी अद्ययावत करण्याची योजना तयार असून आणि वर्षाच्या अखेरीस त्यासंदर्भात घोषणा अपेक्षित असल्याची माहितीही त्यांनी दिली.

बहुतेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण हे कोकणातील निसर्गरम्य ठिकाणी होत असते. मात्र, या भागात चांगल्या दर्जाची चित्रपटगृहे नाहीत ही शोकांतिका आहे. राज्यातील मराठी चित्रपटसृष्टीची स्थिती सुधारण्यासाठी चित्रपट उद्योग आणि राज्य सरकारने एकत्रितपणे काम करायला हवे असे मत अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी व्यक्त केले.