पुणे, ९ जानेवारी २०२५ : सिंहगड रस्त्यावर सर्वाधिक वाहतूक कोंडी होत असलेल्या राजारामपूल ते फनटाईम या अडीच किलोमीटरच्या टप्प्यातील वाहतूक कोंडीच्या खिंडीतून या भागातील नागरिकांची सुटका होणार आहे. विठठल मंदीर ते फनटाईम पर्यंतच्या धायरीकडे जाणाऱ्या दोन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल येत्या मार्च महिन्यात खुला केला जाणार आहे. या पूलाच्या कामासाठी हिंगणे चौकात असलेला शेवटचा गर्डर टाकण्याचे तसेच दोन्ही बाजूच्या रॅम्पचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. तर ज्या भागाचे काम झाले आहे त्या भागात रेलींग, डांबरीकरण तसेच पथदिव्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात पूर्ण करून रस्ता सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे प्रमुख युवराज देशमुख यांनी सांगितले .
अडीच लाख वाहनांचा २५ मिनिटांचा वेळ वाचणार
सिंहगड रस्त्याचे रूंदीकरण तसेच काॅक्रीटीकरणाचे काम २००८ मध्ये केंद्रशासनाच्या जेएनएनयुआरएम अंतर्गत करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर गेल्या दोन दशकात या भागात सर्वाधिक नागरीकरण झाले असून खडकवासला धरणापर्यंत हा भाग पसरला आहे. तर या भागात जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असून त्याला कोणताही पर्यायी रस्ता नाही. परिणामी या रस्त्यावर राजारामपूल ते फनटाईम पर्यंत जाण्यासाठी दररोज अर्धा ते पाऊन तास जात होता. तर जादा कोंडी असल्यास तासभराचा वेळही जात होता. या रस्त्यावर विठठलवाडी, हिंगणे, संतोष हाॅल, माणिकबाग तसेच गंगा भागोद्य पर्यंत पाच प्रमुख चौकात सिंग्नल असल्याने तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठया प्रमाणात जोड रस्ते असल्याने सतत सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या रांगा लागत होत्या. त्यामुळे, महापालिकेने राजारामपूल ते फनटाईम पर्यत उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यातला राजारामपूल येथे स्वारगेटकडे जाणारा ५०० मीटर पूल लोकसभा निवडणूकी आधी सुरू झाला आहे तर आता दुसऱ्या टप्प्यात विठठलमंदीर कमान ते फनटाईम पर्यंतच्या जाण्याच्या आणि येण्याच्या पूलांचे काम सुरू असून जाणाऱ्या पूलाचे काम ८९ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा पूल झाल्यास वाहन चालकांना थेट राजारामपूलावर फनटाईम पर्यंत विना अडथळा जाता येणार असून दिवसाला अडीच ते तीन लाख वाहनांचा २० ते २५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
More Stories
देवयानी पवार करणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथे होणाऱ्या वार्षिक बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व
अचूक बिलिंगसाठी सदोष, नादुरुस्त मीटर तातडीने बदला: महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र यांचे निर्देश
सिंबायोसिस तर्फे “सिम-इमर्ज २०२५” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन