October 21, 2025

पावसाळ्यापूर्वी लोहगावमधील रस्त्यांची व इतर कामे पूर्ण करण्याच्या आमदार बापूसाहेब पठारे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

पुणे, २५ एप्रिल २०२५: लोहगाव भागातील नागरी समस्या सोडवण्यासाठी (ता. २४) नगर रोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयात आमदार बापूसाहेब पठारे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत पठारे यांनी पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

या बैठकीत पुणे महानगरपालिकेचे साहाय्यक आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, ड्रेनेज विभाग तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी लोहगाव येथील पठारे वस्ती रस्ता, लोहगाव-निरगुडी रस्ता, डी. वाय. पाटील रस्ता, उत्तरेश्वर रस्ता, हरणतळे रस्ता, पवार वस्ती रस्ता, काळभोर वस्ती रस्ता आणि वाघमारे वस्ती रस्ता या महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुरुस्ती, तसेच ड्रेनेज व पाणीपुरवठा लाईनच्या कामांच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

पठारे यांनी मागील काही महिन्यांपूर्वी या भागाची पाहणी केली होती. त्यावेळी अनेक रस्त्यांवर पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाईन नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी महानगरपालिकेच्या संबंधित विभागांशी समन्वय साधत ही कामे हाती घेण्याच्या सूचनाही केल्या होत्या. या भागातून पेट्रोल पाइप लाईन जात असल्यामुळे आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच कामे सुरू होतील, असे बैठकीत नमूद करण्यात आले.

“नागरिक बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून रस्ते, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज यंत्रणेची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होतील यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून कामे करून घेणार आहे” असे पठारे यांनी सांगितले.

दरम्यान बैठकीच्या सुरुवातीला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.