पुणे, २५ एप्रिल २०२५: निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया असून, आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासोबतच सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे. याकरीता सर्वोतपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
कुटुंब कल्याण भवन येथे आयोजित राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत राज्यातील ४३ नवीन ‘आपला दवाखान्यां’चे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, विधान परिषदेच्या उपसभापति डॉ. नीलम गोर्हे, राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू श्री रंगा नायक आदी उपस्थित होते.
‘नो डिनायल पॉलिसी’ करणार लागू –
राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत आणि नवीन ४३ ‘आपला दवाखान्यांच्या’ माध्यमातून नव्याने भर पडणाऱ्या आरोग्य सुविधांमुळे राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट, सक्षम आणि गतिमान होईल, असे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्यामुळे एका गरोदर महिलेला जीव गमवावा लागल्याच्या प्रकरणात चौकशी होऊन दोषींवर निश्चित कठोर कारवाई केली जाईल. अशा घटना पुन्हा घडू नये, अशी प्रणाली आणि कठोर नियम सर्व रुग्णालयांना लागू करण्यासाठी राज्य शासन एक नवे धोरण लवकरच राज्यात लागू करणार आहे. या धोरणानुसार कोणतेही रुग्णालय नागरिकाला अत्यावश्यक आरोग्य सेवेपासून वंचित ठेवणार नाही. त्यासाठी राज्यातील रुग्णालयांसाठी ‘नो डिनायल पॉलिसी’ लागू करणार आहे.”
“आरोग्य सेवा पुरविण्यासाठी पुणे हे राज्यातील दुसरे सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे. पुण्यात आरोग्य विभागाची अनेक राज्यस्तरीय कार्यालये आहेत. राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमुळे आरोग्य विभागाची सर्व कार्यालय एकाच छताखाली येणार आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामांमध्ये गतिमानता, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि आरोग्य सुविधा देण्यास मदत होईल. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज या इमारतीचे काम नियोजित वेळेत पूर्ण करावे. आज लोकार्पण करण्यात आलेल्या नवीन आपला दवाखान्यांपैकी पुणे शहरात सात दवाखाने आहेत. या दवाखान्यांच्या माध्यमातून शहरी भागात झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील,” असे आबिटकर यांनी सांगितले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “सार्वजनिक आरोग्य विभागाचे काम समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असून आरोग्य विभागाने आतापर्यंत विविध महत्त्वाच्या मोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातही आपल्या सेवा पुरविल्या आहेत. या पुढील काळातही आरोग्य विभाग चांगली कामगिरी करून लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवेल.”
यांत्रिक वस्त्र धुलाई सेवा केंद्र आणि रेण्वीय निदान प्रयोगशाळा सुरु करण्याची घोषणा-
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने रुग्णालयांमध्ये स्वच्छता, आहार आणि रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या वस्त्रांची स्वच्छता हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. त्यामुळे राज्यातील ८ परिमंडळातील ५९३ आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिक वस्त्र धुलाई सेवा केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यामध्ये साथरोग उद्रेक काळात जीवाणू व विषाणू चाचणी जलद गतीने करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे येथे रेण्वीय निदान प्रयोगशाळा उभारणार असल्याची घोषणा यावेळी आबिटकर यांनी केली.
More Stories
पुणे मेट्रोचे खडकी स्थानक उद्यापासून प्रवासी सेवेत
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पुण्याकडे प्रस्थान; हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिरसात न्हालं वातावरण
‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे -विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार