June 17, 2025

वडगावशेरीत मुळीकांनी तर खडकवासल्यात धनकवडेंनी भरला अर्ज, दोन मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत

पुणे, २९ ऑक्टोबर २०२४: पुण्यातील खडकवासला आणि वडगाव शेरी विधानसभा मतदरासंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांत रस्सीखेच सुरु आहे. निवडणूक न लढविल्यास पक्षांतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे महायुतीने वडगाव शेरी व खडकवासल्यात मैत्रीपूर्ण लढत करण्याचा निर्णय घेतला आहे. वडगाव शेरी मतदार संघातून राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तेथे आता माजी आमदार जगदीश मुळीक हे अपक्ष निवडणूक लढणार आहेत. तर खडकवासल्यात भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांनी अर्ज भरला आहे, तेथे माजी महापौर दत्ता धनकडवडे रिंगणात उतरले आहेत.

पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी वडगाव शेरी व हडपसर या दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्या आहेत. तर कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनग, पर्वती, कोथरूड आणि खडकवासला येथे भाजपचे आमदार असल्याने या जागा भाजप लढविणार आहे.

मुळीक हे लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक होते, पण त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली, त्यामुळे त्यांनी विधानसभेची तयारी सुरु केली. पण जागा वाटपात ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आमदार सुनील टिंगरे हे देशभर गाजलेल्या वादग्रस्त पौर्शे प्रकरणात बदनाम झालेले आहेत. त्यांनी आरोपींना मदत केल्याने त्यांच्यावर टीका केली जाते. त्यामुळे त्यांची उमेदवारी नाकारली जाईल अशी शक्यता होती, पण अजित पवारांनी त्यांनी उमेदवारी दिली आहे. नाराज झालेल्या जगदीश मुळीक यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली. पण पक्षाच्या आदेशाची वाट बघत होते. अखेर आज सकाळी भाजपच्या नेत्यांनी त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यास संपती दिली आहे. वडगाव शेरीत आता सुनील टिंगरे, जगदीश मुळीक व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापू पठारे यांच्याती तिरंगी निवडणूक होणार आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तेथून अचानक राष्ट्रवादीचे दत्ता धनकडवे यांचा अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपचे गणित बिघडणार आहे. पण ही लढत मैत्रीपूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.