पुणे, २९ अक्टूबर २०२४: विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहरातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत सोमवारी अर्ज दाखल केले. मात्र यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे हे गायब असल्याचे दिसून आले. घाटे यांना कसबा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज आहेत. ते आज कसबा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज भरताना तरी उपस्थित राहणार का याकडे लक्ष लागले आहे.
धीरज घाटे कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पक्षाने या ठिकाणाहून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी दिलेली आहे. उमेदवारी न दिल्याने घाटे यांनी समाज माध्यमावर त्यांची भावना व्यक्त करत नाराजी दर्शवलेली होती. त्यावरून राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
सोमवारी शहरात शिवाजीनगर मतदारसंघातून सिद्धार्थ शिरोळे, कॅन्टोन्मेंट मधून सुनील कांबळे, पर्वतीतून माधुरी मिसाळ आणि खडकवासल्यामधून भीमराव तापकीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी या उमेदवारांकडून शक्ती प्रदर्शन केले. या उमेदवारांचा अर्ज भरताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मात्र शहराध्यक्ष धीरज घाटे हे एकाही ठिकाणी उपस्थित नसल्याने त्यांच्या नाराजी बाबत पक्षांतर्गत चर्चेला उधाण आले.
कसबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत रासने आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे धीरज घाटे आज तरी शहराध्यक्ष या नात्याने उपस्थित राहणार का याकडे लक्ष लागले आहे.
More Stories
पुणे मेट्रोच्या ताफ्यात लवकरच नवीन १२ मेट्रो ट्रेन सेट
पुणे: जवानाच्या वेळीच धाव घेतल्याने टळली दुर्घटना; खिडकीत अडकलेल्या चार वर्षाच्या मुलीचे वाचवले प्राण
Pune: डिजे लावणार्या गणेश मंडळांना मदत नाही, डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार