April 27, 2025

येत्या १७ जुलै रोजी होणार ‘नामाचा गजर’

पुणे, दि. १२ जुलै, २०२४ : पुण्यातील कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ‘नामाचा गजर’ हा सांगीतिक कार्यक्रम येत्या बुधवार दि १७ जुलै रोजी सायं ५ वाजता एरंडवणे येथील डॉ कलमाडी श्यामराव हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात संपन्न होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

‘नामाचा गजर’ या कार्यक्रमाचे हे आठवे वर्ष असून यावर्षी प्रसिद्ध गायक शिवानंद स्वामी, मराठी संगीत क्षेत्रातील ‘संगीत सम्राट’ या टॅलेंट शोच्या विजेत्या नंदिनी व अंजली गायकवाड आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे सुपुत्र, गायक श्रीनिवास जोशी व नातू विराज जोशी यांचे गायन ऐकण्याची संधी उपस्थित रसिकांना मिळणार आहे. यावेळी महादेव सागळे (तबला), अविनाश दिघे (संवादिनी), गंभीर महाराज अवचार (पखावज) हे कलाकार साथसंगत करतील.

‘नामाचा गजर’ कार्यक्रमादरम्यान ह. भ .प विश्वनाथ महाराज इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ जे व्ही इंगळे व त्यांच्या पत्नी मेघा इंगळे यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा ‘वैष्णव पुरस्कार’ यावर्षी सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार डॉ भरत बलवल्ली यांना प्रदान करण्यात येईल. रुपये २१ हजार रोख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याआधी पंडित शौनक अभिषेकी, पंडित आनंद भाटे, विदुषी देवकी पंडित, श्रीनिवास जोशी, पंडित हेमंत पेंडसे आणि प्रसिद्ध कथक नर्तक गुरु डॉ नंदकिशोर कपोते यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.