पुणे, दि. २ मे, २०२३ : भरतनाट्यम नृत्याद्वारे सादर केलेली देवीस्तुती याबरोबरच अंजनेय वर्णमच्या बहारदार आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रस्तुतीने ‘नुपुरनाद म्युझिक व डान्स फेस्टिव्हल’चा समारोप झाला. सूर, ताल, लय, नृत्य यांचा संगम यानिमित्ताने पुणेकर रसिकांनी अनुभविला. भैरवी संगीत प्रसारक मंडळ यांच्या वतीने चौथ्या ‘नुपुरनाद म्युझिक व डान्स फेस्टिव्हल’चे आयोजन एरंडवणे, डी पी रस्त्यावरील मॅजेंटा लॉन्स या ठिकाणी नुकतेच करण्यात आले होते. रसिकांसाठी सदर महोत्सव विनामूल्य खुला होता.
यावर्षीच्या महोत्सवाला डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे विशेष सहकार्य लाभले होते. विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. भाग्यश्री पाटील, भैरवी संगीत प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध संतूरवादक डॉ. धनंजय दैठणकर, मंडळाच्या सचिव व सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना गुरु डॉ. स्वाती दैठणकर, भरतनाट्यम नृत्यांगना गुरु डॉ सुचेता भिडे चापेकर, कथक गुरु मनीषा साठे, भरतनाट्यम नृत्यांगना व अभिनेत्री नुपूर दैठणकर आणि तरुण पिढीचे आश्वासक संतूरवादक निनाद दैठणकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर आणि सहकारी यांच्या ‘रंगी रंगला श्रीरंग’ या उपशास्त्रीय गाण्याच्या कार्यक्रमाने झाली. आदि शंकराचार्य यांनी लिहिलेली आणि आर्या आंबेकर यांच्या आई श्रुती आंबेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘भज गोविंदम भज गोविंदम…’ या रचनेने त्यांनी कार्यक्रमाला सुरूवात केली. सर्वगुण संपन्न कृष्णाची कामना करणारी ‘नरवर कृष्णासमान…’ ही ‘संगीत स्वयंवर’ नाटकातील रचना, संत मीराबाई यांची कृष्णभक्ती वर्णीणाऱ्या ‘म्हारा रे गिरिधर गोपाळ, दुसरा ना कोया…’ आणि ‘माई माई कैसे जियूँ रे, कैसे जियूँ रे…’ आदी रचना त्यांनी प्रस्तुत केल्या.
आर्या आंबेकर यांनी सादर केलेल्या गोपीकांच्या मनातील प्रेमाविष्काराचे शब्दांत वर्णन करणारे ‘बाई ग कसं करमत न्हाईगं…’ हे प्रेमगीत आणि ‘बाजे रे मुरलिया बाजे…’ या अभंगाला उपस्थितांनी टाळ्यांच्या ठेका धरला. संत कवी सूरदास यांनी रचलेली ‘जसोदा हरि पालनैं झुलावै…’ ही अंगाई, ‘रंग डारुंगी नन्द के लालन पे…’ ही होरी देखील त्यांनी प्रस्तुत केली. ‘अवघा रंग एक झाला…’ या अभंगाने आर्या आंबेकर यांनी आपल्या कार्यक्रमाचा समारोप केला. त्यांना प्रशांत पांडव (तबला), डॉ राजेंद्र दूरकर (पखवाज), सूर्यकांत सुर्वे (तालवाद्य), रोहित कुलकर्णी (की बोर्ड), सुधांशू घारपुरे (संवादिनी) यांनी साथसंगत केली तर डॉ. अंजली देशपांडे यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले.
यानंतर सुप्रसिद्ध संतूरवादक डॉ. धनंजय दैठणकर व त्यांचे शिष्य व सुपुत्र निनाद दैठणकर यांचा संतूर जुगलबंदीचा अनोखा प्रयोग संपन्न झाला. त्यांनी राग किरवानीने आपल्या वादनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी आलाप, जोड, झाला यांचे दमदार सादरीकरण केले. यानंतर त्यांनी विलंबित रूपक आणि द्रुत तीन ताल यांची बहारदार प्रस्तुती केली. त्यांना उस्ताद अल्लारखां आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचे शिष्य असलेले आदित्य कल्याणपूर हे त्यांनी समर्थ तबलासाथ केली.
दुसऱ्या दिवसाचा आणि महोत्सवाचा समारोप बंगळूरूस्थित भरतनाट्यम नर्तक पार्श्वनाथ उपाध्ये यांच्या सादरीकरणाने झाला. संगीत नाटक अकादमीच्या बिस्मिल्ला खान युवा पुरस्काराने सन्मानित पार्श्वनाथ उपाध्ये यांनी आपल्या ‘मार्गम्‘ या नृत्य कार्यक्रमाचा प्रीमियर यावेळी पुणेकर रसिकांसमोर प्रस्तुत केला. देवीस्तुती सादर करीत त्यांनी आपली सादरीकरणाला सुरुवात केली. रामकथेतील हनुमंताचे स्थान अधोरेखित करणारे ‘अंजनेय वर्णम’ याची त्यांनी बहारदार प्रस्तुती केली. हनुमंताने सूर्याला फळ समजून गिळणे, महिरावणाची कथा अशा रंजक कथा त्यांनी भरतनाट्यम सादरीकरणातून उपस्थितांसमोर उलगडून दाखविल्या. प्रभावी प्रकाशयोजनेने या सादरीकरणाला एका वेगळ्या उंचीवर नेले. पार्श्वनाथ उपाध्ये यांनी ‘मंगलम्’ने आपल्या कार्यक्रमाचा व महोत्सवाचा समारोप केला. त्यांना कार्तिक हेब्बर (गायन), आदित्य पी व्ही (नटुवंगम), मंगला वैद्यनाथन (व्हायोलिन), कार्तिक व्यदार्थी (मृदंगम) यांनी साथसंगत केली तर कीर्ती कुमार यांनी प्रकाशयोजना केली होती.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सुरुवातीला नुपूरनाद अकादमीच्या विद्यार्थिनी, गुरु डॉ. स्वाती दैठणकर आणि नुपूर दैठणकर यांच्या शिष्यांनी आपल्या नृत्यप्रस्तुतीमधून गुरु पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांना आदरांजली वाहिली. यावेळी या विद्यार्थीनींनी देवीस्तुती व नृसिंहस्तुती प्रस्तुत केली. यानंतर दिल्लीस्थित जयपूर घराण्याच्या सुप्रसिद्ध कथक नर्तिका विधा लाल यांनी राग बैरागी, नऊ मात्रा मध्ये ‘हरी- हर’ ही कृष्ण व शिवस्तुती प्रस्तुत करीत आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. यांनतर त्यांनी तीन तालात विलंबित लयीमध्ये शुद्ध पारंपरिक कथक नृत्य सादर केले. यामध्ये जयपूर घराण्याच्या अनेक सूक्ष्म गोष्टी त्यांनी उपस्थितांसमोर सादर केल्या. यांनतर कवी रसखान यांनी रचलेल्या ‘मोर-पखा सिर ऊपर राखिहौं…’ ही राग मियां मल्हार मधील रचना त्यांनी अभिनय व नृत्याद्वारे उपस्थितांसमोर सादर केली.
तीन ताल व द्रुत लयीचे सादरीकरण करीत तोडे, तुकडे, तिहाई ही जयपूर घराण्याची वैशिष्ट नृत्याच्या माध्यमातून सादर करीत विधा लाल यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना अमान आली (तबला), नितीश पुरोहित (सरोद) तर शुभम खंडाळकर (गायन) यांनी साथसंगत केली.
यानंतर शौनक अभिषेकी व रघुनंदन पणशीकर यांनी एकल गायन प्रस्तुत केले. शौनक अभिषेकी यांनी राग सरस्वतीने आपल्या गायनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी रूपक तालात ‘रैन की बात’ ही ख्याल रचना सादर केली. यानंतर ‘सजन बिन कैसे…’ ही द्रुत अद्धा तीन तालातील बंदिश प्रस्तुत केली. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), अभेद अभिषेकी, राज शहा आणि विश्वजित मेस्त्री (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
यानंतर रघुनंदन पणशीकर यांनी सतारवादक शंकर अभ्यंकर यांनी बांधलेली रागेश्री रागातील ‘श्याम दरस कैसे पाऊं..’ ही बंदिश सादर केली. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), सौरभ काडगावकर, अश्विनी पुरोहित, शुभम खंडाळकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाच्या शेवटी रघुनंदन पणशीकर आणि शौनक अभिषेकी यांनी ‘बाजे रे मुरलीया बाजे… ‘ आणि ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ हे अभंग एकत्रित सादर करीत आजच्या पहिल्या दिवसाचा समारोप केला.
डॉ स्वाती दैठणकर यांनी दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर निरजा आपटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
More Stories
५५० कातकरी आदिवासींना जात प्रमाणपत्राचे वाटप, ५५ कुटुंबांना मिळणार हक्काचे पक्के घर
पुणे: पर्वतीत भाजपाची वाढली धाकधूक! मिसाळ विरोधक भिमालेंनी महापालिकेत केला अर्ज
तुम्ही यांना विधानसभेत पाठवा; पक्ष करताच पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी जाहीर