July 22, 2024

जागतिक संगीत दिनी पुणेकरांनी अनुभविली गायन- वादनाची पर्वणी

पुणे, दि. २२ जून, २०२४ : सुमधुर बासरीवादन आणि भावपूर्ण अभंगगायनाद्वारे पुणेकरांना जागतिक संगीत दिनानिमीत्त गायन आणि वादनाची अनुभूती मिळाली. निमीत्त होते पुण्यातील इंडी म्युझिकॉन्स व रोहन बिल्डर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राईज’ हा उपक्रमाचे.

अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नव्या पिढीतील आश्वासक कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने ‘राईज’ हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, या उपक्रमातील दुसरा कार्यक्रम पटवर्धन बाग, एरंडवणे येथील सेवाभवन येथे संपन्न झाला. यावेळी मिलिंद दाते यांचे शिष्य अनुराग जोशी यांचे बासरीवादन आणि कोलकाता येथील सुप्रसिद्ध आयटीसी रिसर्च अकादमीचे विद्यार्थी व पंडित अजॉय चक्रबर्ती यांचे शिष्य मेहेर परळीकर यांचे अभंगगायन रंगले.

आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, विराज जोशी, ख्यातनाम शास्त्रीय गायक पं रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर, राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे, नेहा देशपांडे, सुप्रसिद्ध बासरीवादक मिलिंद दाते, लिबरल आर्ट्स विषयातील तज्ज्ञ व श्री बालाजी विद्यापीठ, पुणे या संस्थेच्या आर्ट्स, हयुमॅनिटीज आणि सोशल सायन्सेस विभागाच्या प्राचार्या डॉ प्रीती जोशी, कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक सुधाकर चव्हाण, मित्र महोत्सवाचे आयोजक धनंजय गोखले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या पूर्वार्धात अनुराग जोशी यांनी राग चंद्रकंस सादर केला. यामध्ये त्यांनी रूपक ताल आणि द्रुत तीन ताल यामधील बंदिशी प्रस्तुत केल्या. देस रागातील धून सादर करीत त्यांनी समारोप केला. अनुराग यांना चारुदत्त फडके यांनी तबला तर गौरी देशपांडे यांनी बासरीसाथ केली.

यानंतर मेहेर परळीकर यांचे अभंगगायन संपन्न झाले. त्यांनी ‘जय जय राम कृष्ण हरी…’ या नामजपाने सादरीकरणाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी संत ज्ञानेश्वरांचा ‘रूप पाहता लोचनी…’ हा भारतरत्न पं भीमसेन जोशी यांनी संगीतबद्ध केलेला अभंग सादर केला. ‘पंढर पुरीचा मेळा…’, ‘काल देहासी आला खाऊ…’ हे अभंग देखील त्यांनी प्रस्तुत केले. संत तुकारामांचा ‘पंढरीचे भूत मोठे…’ हा अभंग गात त्यांनी उपस्थितांची वाह वाह मिळविली. यानंतर त्यांनी संत मीराबाई यांनी लिहिलेला आणि गुरु पद्माकर थत्ते यांनी संगीतबद्ध केलेला ‘करम गती है न्यारी…’ हे भजन सादर केले. संत तुकारामांचा ‘हेची दान देगा देवा…’ हा राग भैरवीमधील अभंग सादर करीत त्यांनी समारोप केला. मेहेर परळीकर यांना रामकृष्ण करंबेळकर (तबला), प्रथमेश तारळकर (पखवाज), अथर्व कुलकर्णी (संवादिनी), सुहास परळीकर (तालवाद्य) व ईशान मोडक (तबला) यांनी साथसंगत केली.