पिंपरी, १४ जून २०२५ : पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी खासगी डॉक्टरांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महापालिकेतर्फे सर्व डॉक्टरांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन आणि साधनसामग्री वेळेवर उपलब्ध करून दिली जाईल. शहरातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हे आपले सामूहिक उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
पावसाळ्यात होणाऱ्या डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांबाबत खासगी वैद्यकीय क्षेत्र अधिक सजग राहावे, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवड शाखा (आयएमए-पीसीबी), पिंपरी चिंचवड डॉक्टर्स असोसिएशन (पीसीडीए) आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (एनआयएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘मान्सूनपूर्व काळजी’ या विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते. या उपक्रमात शहरातील तीनशेहून अधिक खासगी डॉक्टरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
आयुक्त सिंह म्हणाले,’ डॉक्टरांनी ‘चेक, क्लीन, कव्हर’ ही त्रिसूत्री आपल्या रुग्णांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून शहर पातळीवर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवता येतील. प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याचे आपल्या सर्वांचे सामूहिक उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे आयुक्त सिंह म्हणाले.
याप्रसंगी विशेष मार्गदर्शक डॉ. दीपक साळुंखे यांनी डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या कीटकजन्य व जलजन्य आजारांच्या संदर्भात अत्यंत सोप्या आणि प्रभावी पद्धतीने मार्गदर्शन केले. रोगांची लक्षणे, प्रतिबंधक उपाय, क्लिनिक पातळीवर घ्यावयाची काळजी आणि रिपोर्टिंग यंत्रणांवर त्यांनी माहिती दिली. या सादरीकरणानंतर एक प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले, ज्यामध्ये सहभागी खासगी डॉक्टरांनी त्यांना उद्भवणारे शंका व प्रश्न विचारले. डॉ. साळुंखे यांनी सर्व शंकांचे निरसन केले. या विश्लेषणात्मक व सखोल माहितीमुळे रोगांचे निदान व प्रतिबंध यामध्ये निश्चितच मदत होणार आहे, अशी भावना सहभागी डॉक्टरांनी व्यक्त केली.
स्वागत डॉ. अंजली ढोणे यांनी तर आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. वर्षा डांगे यांनी आभार मानले.
या वेबिनारच्या यशस्वीतेसाठी आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुपेकर आदींनी परिश्रम घेतले.
More Stories
पुणे: पिंपरी चिंचवडमधील पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पास पर्यावरण ना हरकत प्रमाणपत्र; लवकरच कामाला सुरुवात
पुणे: वाकड ते मामुर्डी दरम्यान अंडरपासजवळील वाहतूक कोंडीवर तोडगा; चिंचवड आमदार जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
पुणे: पिंपरी-चिंचवडमधील सोसायटीधारक ‘ट्रॅफिक’ समस्येने वैतागले, मुख्यमंत्र्यांबरोबर बैठकीची केली मागणी