July 25, 2024

पीएमआर ओपन एटीपी चॅलेंजर पुरूष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 25 देशांतील खेळाडू सहभाग

पुणे, 23 फेब्रुवारी 2023: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित पी एम आर ओपन एटीपी चॅलेंजर पुरूष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 25 देशांतील अव्वल टेनिसपटूनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा एमएस एल टीए स्कूल ऑफ टेनिस कोर्ट म्हाळुंगे बालेवाडी येथे 26 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलमेंट ऑथोरीटी (पीएमआरडीए) यांनी प्रायोजित केलेल्या या स्पर्धेसाठी पाच वर्षांचा करार केला असुन 26 फेब्रुवारी ते 5मार्च 2023 या कालावधी दरम्यान रंगणारी ही स्पर्धा भारतातील एटीपी चॅलेंजर मालिकेतील तिसरी स्पर्धा आहे. यापूर्वीच्या दोन स्पर्धा बंगळुरू आणि चेन्नई येथे पार पडल्या आहेत.

पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल म्हणाले की, पुण्याच्या टेनिस क्षितिजावर पीएमआर चलेंजर स्पर्धा हा एक नवा तारा आहे. पुणे मेट्रो पोलिस रिजनची प्रतिमा जगभरात पोहोचण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेला प्रायोजित करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव मिळवून देणे आणि त्याचवेळी टेनिसचा प्रचार करणे असे या स्पर्धा प्रायोजित करण्यामागील आमचे दोन हेतू आहेत.

या स्पर्धेसाठी 130000 अमेरिकन डॉलर्स पोरितोषिक रक्कम (1.06 कोटी रुपये) ठेवण्यात आली असून विजेत्याला 100एटीपी गुण आणि 17650 डॉलर्स (14.47 लाख रुपये), तर उपविजेत्याला 60एटीपी गुण आणि 8.5 लाख रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे पहिल्या फेरीत पराभूत होणाऱ्या खेळाडूलाही 1270 डॉलर्स (104लाख रु.), तसेच पात्रता फेरीतील खेळाडूला 380 डॉलर्स (31हजार रु.) इन्सेन्टिव्ह मिळणार आहे.

एमएसएलटीएचे अध्यक्ष आणि स्पर्धा संचालक प्रशांत सुतार म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपासून पुण्यात नियमितपणे सुरू असलेल्या चॅलेंजर स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना बहुमोल एटीपी गुण आणि अनुभव मिळत असल्याचे दिसून आल्यामुळे ही स्पर्धा सातत्याने आयोजित करण्याचे आम्ही ठरविले. महाराष्ट्रातील टेनिस क्रीडाप्रकाराच्या प्रचार आणि प्रसारासाठी एमएसएलटीएच्या दूरदर्शी प्रयत्नांचा हा एक भाग असल्याचेही सुतार यांनी सांगितले.

एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले, की केवळ एका महिन्याचा कालावधीत सलग दुसऱ्या प्रमुख टेनिस स्पर्धेचे आयोजन हा पुणे शहरासाठी अभिमानाचा क्षण असून महाराष्ट्रातील टेनिसच्या विकासासाठी त्याचा निश्चितच बहुमोल उपयोग होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने गेल्या पाच वर्षांपासून टाटा ओपनचे यशस्वी आयोजन केल्यामुळे प्रायोजकांनीही आमच्यावर विश्वास दाखविला आहे. श्री. महिवाल आणि क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांच्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.

या स्पर्धेमुळे आमच्या खेळाडूंना बहुमोल एटीपी गुणांची कमाई करता येत असून त्यामुळे त्यांच्या मानांकनातही सुधारणा होत आहे, असे सांगून अय्यर म्हणाले की, या वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान आमच्या खेळाडूनी एकूण 700एटीपी गुणांची कमाई केली आहे. एकूण 25 देशांमधील खेळाडूंच्या सहभागामुळे ही स्पर्धा दर्जेदार आणि चुरशीची होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये एकूण 32 खेळाडूंचा समावेश असून त्यात 23 थेट प्रवेशिका, 3वाईल्ड कार्ड आणि 6 पात्रतावीरांचा समावेश आहे. पात्रता फेरीत 24खेळाडू आणि 4 वाईल्ड कार्डचा समावेश आहे. जागतिक क्रमांक 108 असलेल्या 21वर्षीय तैपेईच्या त्सेन चेयुन हसिन संभाव्य विजेत्यांमध्ये अग्रस्थानी असून केपीआयटी चॅलेंजर विजेता ऑस्ट्रेलियाचा जेम्स डकवर्थं (137 मानांकित), ऑस्ट्रियाचा 26वर्षीय सेबेस्टियन ऑफनर (152), इंग्लंडचा 27 वर्षीय पेनिस्टन रयान (159), इटलीचा गुणवान खेळाडू 19वर्षीय लुका नार्डी (164), आणि इटलीचाच कोबोली फ्लॅव्हियो (172) हे मानांकित खेळाडू झुंजनार आहेत

उझबेकिस्तानचे आंद्रे कॉर्निलोव्ह हे या स्पर्धेचे एटीपी निरीक्षक असून शितल अय्यर या मुख्य रेफ्री म्हणून काम पाहणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या विशेष सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. आर्यन पम्प्स, डनलॉप (अधिकृत इक्विपमेंट पार्टनर ), एनर्झल (अधिकृत एनर्जी ड्रिंक पार्टनर), , आणि मणिपाल रुग्णालय (वैद्यकीय साहाय्य) हे स्पर्धेचे अन्य प्रायोजक भागीदार आहेत. स्पर्धेतील सामने दररोज सकाळी 10 वाजता सुरू होणार असून सर्व प्रेक्षकांना विनामूल्य व मुक्त प्रवेश देण्यात येणार आहे.

मानांकन यादी-
पुरुष एकेरी – १) जेसन कुब्लर (ऑस्ट्रे. ७९), २) त्सेन चेयुन हसिन (तैपेई १०८), ३) जेम्स डकवर्थ (ऑस्ट्रे. १३७), ४) सेबॅस्टियन ऑफनर (ऑस्ट्रिया १५२), ५) रयान पेनिस्टन (इंग्लंड १५९), ६) लुका नार्डी (इटली १६४), ७) फ्लॅव्हियो कोबोली (इटली १७२) व ८) फ्रन्सेस्को मास्ट्रेली (इटली १८३);

पुरुष दुहेरी – १) मार्क पोलमन्स मॅक्स रसेल (ऑस्ट्रे), २) अर्जुन कढे – मॅक्सिमिलन न्यूख्रिस्ट, ३) पेत्र नौझा – ॲन्ड्रयू पोल्सन (क), ४) तोशिहिदे मात्सुई-कैटो युसुगू (जपान).