October 5, 2024

पंतप्रधानांच्या ‘डिझाईन इन इंडिया आणि डिझाईन फॉर दी वर्ल्ड’ या भविष्यवेधी संकल्पनेचे डिझाईन समुदायाकडून स्वागत

पुणे, दि. १७ ऑगस्ट, २०२४ : नुकत्याच संपन्न झालेल्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करीत असताना ‘डिझाईन इन इंडिया आणि डिझाईन फॉर दी वर्ल्ड’ या भविष्यवेधी संकल्पनेची मांडणी केली. डिझाईन कम्युनिटीकडून या संकल्पनेचे स्वागत करण्यात आले असून पंतप्रधानांची या क्षेत्राकडे पाहण्याची दृष्टी नजीकच्या काळात भारताला जागतिक पटलावर ‘डिझाईन हब’ ही महत्त्वपूर्ण ओळख मिळवून देईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

देशाचे पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी भारतातील डिझाईन क्षेत्राबद्दल बोलले हा देशातील डिझाईन समुदायासाठी एक महत्त्वपूर्ण व मैलाचा दगड आहे असे सांगत असोसिएशन ऑफ डिझायनर्सच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष बालकृष्ण महाजन म्हणाले, “आज आपला देश जागतिक पातळीवर तरुण डिझायनर्सचा देश म्हणून ओळखला जातो. भारतातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या ठिकाणी भारतीय डिझायनर्स हे जगातील सर्वोत्तम कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या भूमिका निभावत आहेत. शिवाय एकूणच सर्जनशीलता व कामाच्या गुणवत्तेसाठी त्यापैकी अनेकांना रेड डॉट, आयएफ पुरस्कार यांसारख्या जागतिक व्यासपीठांवर देखील गौरविण्यात आले आहे. भारतातील डिझाईन उद्योगाचे मूल्य हे फॅशन आणि इंटिरियर्स या क्षेत्रांना वजा करता १८ ते २० हजार कोटी रुपये इतके असून आज सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या क्षेत्राचा योगदान हे अंदाजे २-३% इतके आहे.” या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची ‘डिझाईन इन इंडिया आणि डिझाईन फॉर दी वर्ल्ड’ ही संकल्पना महत्त्वाची ठरेल शिवाय मेक इन इंडिया या केंद्र सरकारच्या उपक्रमाला देखील पूरक असेल असे मत महाजन यांनी व्यक्त केले.

‘जागतिक आयटी हब’ म्हणून ओळखला जाणारा आपला देश अशा प्रकारच्या संकल्पनांमुळे येत्या काळात जगभरात ‘डिझाईन हब’ म्हणून नावारूपास येईल. आज भारत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत असताना आज अनेक कंपन्यांमध्ये डिझाईनचा अंतर्भाव करून इतरांपेक्षा लक्षणीय कामगिरी करण्याची क्षमता आहे. शिवाय डिझाईनमधील गुंतवणूक ही मार्केट शेअर आणि इक्विटीमध्ये जलद वाढीची क्षमता देखील दर्शवित आहे, ही बाब महत्त्वपूर्ण असल्याकडे महाजन यांनी लक्ष वेधले. येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) है डिझाईनसाठी एक उपयुक्त तंत्रज्ञान म्हणून उदयास येईल, असेही ते म्हणाले.

या संकल्पनेद्वारे डिझाईन व्यवसायाला खऱ्या अर्थाने धोरणात्मकरीत्या चालना मिळेल. जर भारतीय अर्थव्यवस्थेला जगात नवीन बाजारपेठ शोधायची असेल आणि परकीय निर्यातीवरील आपला अवलंब कमी करायचा असेल तर डिझाईनिंग क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. या क्षेत्रातील एक व्यावसायिक म्हणून या संकल्पनेचे मी स्वागत करतो आणि तिचे धोरणात्मक आणि कृतीत्मक रुपांतर पाहण्यास मी उत्सुक आहे असे इंडस्ट्रीयल डिझाईनर, एलिफंट डिझायनर्स या संस्थेचे संचालक आणि असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आशिष देशपांडे यांनी सांगितले.

आज भारतीय डिझाईन शिक्षण क्षेत्रात अनेक पटींनी वाढ झाली असून डिझाईनमधील विविध स्पेशलायझेशनमध्ये औपचारिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रदान करणाऱ्या १०० हून अधिक डिझाईन संस्था देशभरात कार्यरत आहेत. यांमधून १० हजारांहून अधिक विद्यार्थी पदवीधर झाले आहेत. डिझाईन क्षेत्र हे अभियांत्रिकी, वास्तुविशारद आणि ललित कला शिक्षणाव्यतिरिक्त एक चांगला पर्याय म्हणून समोर येत आहे. दुसरीकडे कोणत्याही व्यवसायाच्या यशामध्ये डिझाईन कौशल्याचे महत्त्व आता लक्षात येऊ लागल्याने अलगतपणे त्याचा स्वीकार करण्यास देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात डिझाईन शिक्षण क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे असे म्हणता येईल, असे मत एमआयटी कला, डिझाईन व तंत्रज्ञान विद्यापीठाच्या एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचे संचालक आणि असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य प्रो डॉ नचिकेत ठाकूर यांनी व्यक्त केले.

आज नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क सारख्या स्कॅन्डिनेव्हियन देशांसोबतच युरोप आणि अमेरिका या विकसित देशांनी शिक्षणामध्ये डिझाईन या विषयाला महत्त्व दिले आहे. मात्र असे असले तरी आज हे देश भारतातील शैक्षणिक संस्थांशी संबंध जोडण्यासाठी उत्सुक आहेतच शिवाय भारताकडे आगामी बाजारपेठ म्हणूनही पाहत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे आहे. २०२० मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केल्यामुळे, मेक इन इंडिया उपक्रमाचे यश, अटल इनोव्हेशन मिशन, स्टार्टअप इंडिया मोहीम आणि डिझाईनवर अलीकडेच दिलेले लक्ष यामुळे डिझाईन शिक्षण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे. ही संपूर्ण परिसंस्था डिझाईन शिक्षणाच्या वाढीस पूरक ठरेलच शिवाय त्याच्या वाढीला चालना देखील देईल, असे ही ठाकूर म्हणाले.