May 5, 2024

पं व्यंकटेश कुमार व पं मोहन दरेकर यांच्या गायनाने पुणेकर रसिक मंत्रमुग्ध

पुणे, दि. ३० मार्च, २०२४ : पं. जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य संगीताचार्य पं मोहन दरेकर यांचे बहारदार गायन, सारंगीवादक पं राम नारायण यांचे नातू आणि शिष्य हर्ष नारायण यांचे सारंगी वादन आणि ज्येष्ठ गायक पंडित व्यंकटेश कुमार यांच्या कसदार गायनाने १८ व्या पं जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचा दुसरा दिवस आज संपन्न झाला.

उज्वल केसकर, आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेला तीन दिवसीय पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न होत आहे.

महोत्सवाचे आयोजक आणि  पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य व सुपुत्र पं शौनक अभिषेकी, माजी विरोधी पक्ष नेते उज्ज्वल केसकर, बढेकर समूहाचे प्रवीण बढेकर, आपला परिसर संस्थेचे अध्यक्ष महेश पानसे, विद्येश  रामदासी, माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावर्षी महोत्सवासाठी बढेकर गृप आणि विलास जावडेकर डेव्हलपर्स, लोकमान्य मल्टपर्पज को ऑपरेटिव्ह बँक लि., अंशुमन टेक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तरंगिणी प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाचे औपचारिक उद्घाटन आज संपन्न झाले. मयूर कुलकर्णी यांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी संपन्न झालेल्या तिसऱ्या सत्राची सुरुवात नम्रता गायकवाड यांच्या सनई वादनाने झाली. त्यांनी राग मुलतानी सादर केली. यानंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य संगीताचार्य पं मोहन दरेकर यांच्या गायनाने झाली. दरेकर यांचा आयोजकांच्या वतीने षष्ट्याब्दीपूर्ती निमित्त सन्मानही करण्यात आला.

त्यांनी यावेळी राग श्री प्रस्तुत केला. यामध्ये त्यांनी विलंबित झपतालमध्ये ‘प्रभू के चरण कमल…’ आणि ‘अब मोरी बाही गहो…’ ही दृत बंदिश सादर केली. यानंतर त्यांनी राग धवला श्री सादर केला. यामध्ये त्यांनी ‘मालिनीया गुंद लाओ री…’ ही बंदिश सादर केली. ‘पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी…’ या अभंगाने त्यांनी समारोप केला.

अभिषेकी बुवांनी आम्हाला मुलांप्रमाणे सांभाळले असे सांगत दरेकर म्हणाले, ” बुवांनी केवळ आम्हाला गाणे शिकवले असे नाही त्यांनी आमच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. आमच्यावर चांगले संस्कार केले.
चौमुखी कलाकार व्हा असे ते कायम म्हणायचे. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ तेव्हा कळायचं नाही. आज ते नाहीत तेव्हा ही उकल होते आहे.” त्यांना सुभाष कामत (तबला), उदय कुलकर्णी (संवादिनी), ज्ञानेश्वर दुधाने (पखावज), मयूर महाजन व ज्ञानेश्वर भोयर (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

यानंतर सारंगीवादक पं राम नारायण यांचे नातू आणि शिष्य हर्ष नारायण यांचे सारंगी वादन संपन्न झाले. राग सरस्वती प्रस्तुत करीत हर्ष नारायण यांनी आपल्या वादनाला सुरुवात केली. आलाo, जोड, ताना यांचे बहारदार सादरीकरण त्यांनी केले. यानंतर आपल्या आजोबांच्या विलंबित तीन ताल आणि द्रुत झपताल मधील बंदिशी त्यांनी सादर केल्या. राग मिश्र पिलू मध्ये तीन ताल मधील गत वाजवीत त्यांनी समारोप केला. अजिंक्य जोशी यांनी हर्ष नारायण यांना समर्पक तबलासाथ केली.

वडील पंडित ब्रीज नारायण कार्यक्रमा निमित्त परदेश दौऱ्यावर असताना आजोबा पंडित राम नारायण यांच्या सोबत लहानपणी बराच काळ घालवता आला. ते सारंगी वाजवत असताना सारंगीच्या आवाजाने प्रेरित झालो आणि त्यांच्याकडे औपचारिक शिक्षण सुरू झाले असे सांगत हर्ष नारायण म्हणाले, “सारंगी हे वाद्य दुर्मिळ होत चालले आहे. हे वाद्य वाजवायला कठीण आहे असे अनेक जण म्हणतात. मात्र ते वाजवतानाची टेक्निक मला आजोबांनी शिकवली. नव्या पिढीने ही शिकायला हवी आहे. हे वाद्य वाजविताना बोटांना दुखापत होते ही अफवा आहे. सारंगी शिकणाऱ्या शिष्यांनी ही अफवा मिटवायला हवी असे मला वाटते.”

माझ्या आजोबांनी हे वाद्य जागतिक स्तरावर नेण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत चांगले काम करण्याचा निर्धार असल्याचे हर्ष नारायण म्हणाले.

पं जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप पद्मश्री पं व्यंकटेश कुमार यांच्या कसदार गायनाने झाला. त्यांनी राग केदार गायला. यामध्ये त्यांनी विलंबित एकताल मधील ख्याल सादर केला. यानंतर त्यांनी ‘कान्ह रे नंद नंदन…’ ही बंदिश प्रस्तुत केली. ‘अब कैसे घर जाउं मैं…’ ही ठुमरी त्यांनी सादर केली. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), शिवराज पाटील व कैवल्य पाटील (तानपुरा) यांनी साथसंगत केली. रवींद्र खरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.