May 5, 2024

रंगतदार गायन आणि दमदार तबलावादनाने रंगला ‘युवोन्मेष’

पुणे, दि. ३१ मार्च २०२४  – रंगतदार गायनाची दोन सत्रे आणि तयारीचे एकल तबलावादन, अशा त्रिवेणी संगमाचा अनुभव पुणेकर रसिकांनी घेतला. युवा गायक दीपक सिंह आणि गायिका विलीना पात्रा यांचे सुरेल गायन आणि युवा तबलावादक सावनी तळवलकर यांचे दमदार वादन, यामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले.

पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवातील ‘युवोन्मेष’ या सत्राचा उत्तरार्ध रविवारी सकाळी रंगला. युवा कलाकारांच्या गायन-वादनाला रसिकांचा उत्साही प्रतिसाद लाभला होता.उज्ज्वल केसकर, आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाच्या रविवारी रंगलेल्या सत्रात युवा कलाकारांनी आपल्या सादरीकरणाने कलाक्षेत्रात एक आश्वासक वातावरणनिर्मिती केली.

कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा संगीत महोत्सव संपन्न होत आहे. महोत्सवाचे हे १८ वे वर्ष आहे. महोत्सव सर्व संगीत रसिकांसाठी विनामूल्य खुला होता.

रविवारी पहिल्या सत्राची सुरुवात युवा गायक दीपक सिंह यांनी समयोचित अशा राग बिलासखानी तोडी मधील ‘नीके घुंघरिया’ (विलंबित तीनताल) या पारंपरिक बंदिशीने केली. त्याला जोडून ‘नीके नीके शोभा देखत’ ही पारंपरिक रचना द्रुत तीनतालात त्यांनी सादर केली. तसेच पाठोपाठ पं. कुमार गंधर्व यांनी गाजवलेला ‘देरना देरना’ हा तराणी द्रुत एकतालात पेश केला. दीपक सिंह यांनी ‘बहुमुखी प्रतिभा के धनी पं. जितेंद्र अभिषेकी – एक अध्ययन’, या विषयावरील पीएचडी प्राप्त केली आहे. त्यामुळे त्यांचे या महोत्सवातील गायन औचित्याचे ठरले. पं. अभिषेकी यांना आदरांजली म्हणून दीपक सिंह यांनी राग मनोरंजनी मध्ये ‘आज सखी आनंद भयो है’ ही रचना झपतालात सादर केली. तसेच द्रुत तीन तालात ‘नित चित चैन नाही मोरे माई’ ही पं. अभिषेकीबुवांची रचना सादर केली. दीपक सिंह यांना अभिजीत बारटक्के (तबला), माधव लिमये (संवादिनी) तसेच शशांक उपाध्याय व श्रीज दाणे यांनी तानपुऱ्यावर साथ केली.

युवा तबलावादक सावनी तळवलकर यांनी त्रिताल सादर केला. तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांची कन्या आणि शिष्या असणाऱ्या सावनी यांनी पेशकार, कायदा, रेला, तुकडे, चक्रधार…सादर करत तसेच अनेक बंदिशी पेश करत, तबलावादनातील आपले प्रभुत्व रसिकांसमोर आणले. महिला तबलावादकांची संख्या अत्यल्प असताना, सावनी यांचे एकल तबलावादन रसिकांची दाद मिळवणारे ठरले. त्यांना अभिषेक शिनकर यांनी लेहेरा साथ केली.

युवोन्मेष सत्राची सांगता मेवाती घराण्याच्या युवा गायिका विलीना पात्रा यांच्या सुरेल गायनाने झाली. त्यांनी राग शुद्धसारंग मध्ये ‘सकल बन लाय रहे हरे हरे’ ही पारंपरिक बंदिश विलंबित एकतालात सादर केली. त्याला जोडून संगीतमार्तंड पं. जसराज विरचित ‘जावो जी जावो छलिया’ ही द्रुत तीनतालातील रचना सादर केली. ‘विष्णुमय जग’ या पं. अभिषेकीबुवांच्या भक्तीरचनेने त्यांनी गायनाची सांगता केली. त्यांना आशय कुलकर्णी (तबला), अमेय बिछू (हार्मोनियम), ज्ञानेश्वार दुधाणे (पखवाज) तसेच दीक्षा सोपेकर व समीक्षा चंद्रमोरे यांनी तानपुर्याची साथ केली. नियती विसाळ यांनी सूत्रसंचालक केले. तालयोगी पं. सुरेश तळवलकर आणि ज्येष्ठ गायिका विदुषी पद्मा तळवलकर यांच्या हस्ते कलाकारांचे सत्कार करण्यात आले.