May 8, 2024

पुणे: पार्ट टाईम नोकरीचे आमिष पडले १८ लाखांना, ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने घातला गंडा

पुणे, दि. २१/०८/२०२३: ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने नागरिकांना लाखो रूपयांचा गंडा घातला जात आहे. मात्र, तरीही अनेकजण भुरळून सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत असल्याचे दिसून आले आहे. ऑनलाईनरित्या जॉब मिळवा, घरबसरल्या लाखो रूपये कमवा, लाईक आणि कमेंट्स करून पैसे कमवा अशा फसव्या जाहिरातींना बळी पडून नागरिक पैसे गमवित आहेत.

पार्ट टाईम नोकरीच्या आमिषाने आणि टास्क पुर्ण करण्याचा बहाणा करून सायबर चोरट्याने तरूणाला तब्बल १८ लाख ७० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना मे ते जून २०२३ कालावधीत मगरपट्टा परिसरात घडली आहे. याप्रकरणी शरद गुप्ता वय ३९, रा. मगरपट्टा यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद एका खासगी कंपनीत कामाला असून मगरपट्टा परिसरात राहायला आहेत. मे २०२३मध्ये सोशल मीडियाद्वारे त्यांना सायबर चोरट्याने संपर्क साधला. ऑनलाईन टास्कचे आमिष दाखवून लाखो रूपये कमविण्याचे स्वप्न दाखविले. त्यांच्यासोबत ओळख वाढवून एक महिन्यामध्ये विविध कारणे सांगून बँक खात्यातून तब्बल १८ लाख ७० हजारांवर रोकड वर्ग करण्यास भाग पाडले. मात्र, त्यानंतरही जॉब न मिळाल्याने तरुणाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानंतर याप्रकरणी आता सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक डगळे तपास करीत आहेत.