May 19, 2024

पुणे: सवलत न मिळालेल्या मिळकतीचे सर्वेक्षण

पुणे, ता. ६/०५/२०२४: मिळकतकराची ४० टक्के सवलत अद्याप १ लाख ९३ हजार पुणेकरांनी घेतलेली नाही. त्यामुळे अशा मिळकतीचे सर्वेक्षण करून नेमकी काय अडचण आली आहे हे महापालिकेने शोधण्यास सुरुवात केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर हिंगणे, वडगाव, धायरी भागात सर्वेक्षण झाले आहे.

राज्य सरकारने पुणेकरांना लागू असलेली १९७० पासूनची मिळकतकराची ४० टक्के सवलत काढून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पहिल्या टप्प्यात ज्या नागरिकांचे दोन फ्लॅट आहेत किंवा भाडेकरू ठेवले आहेत अशा ९७ हजार मिळकतींचा समावेश करण्यात आला. त्यांना २०१९ ते २०२२ या तीन वर्गातली ४० टक्के सवलतीची रक्कम फरकासह भरण्याचे आदेश देण्यात आले. याविरोधात नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय रद्द केला. ज्या नागरिकांची सवलत गेलेली आहे, त्यांनी पीटी ३ अर्ज भरण्याची मुदत दिलेली होती. यामध्ये शहरातील सुमारे २ लाख ६४ हजार मिळकतींना ४० टक्के सवलत मिळावी यासाठी अर्ज करणे अपेक्षीत होते. पण अद्याप १ लाख ९३ हजार नागरिकांनी पीटी ३ अर्ज भरलेला नाही. या मिळकतींचा अर्ज का भरले गेलेला नाही यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर हिंगणे, वडगाव धायरी भागात १० हजार मिळकतीचे सर्वेक्षण केले जाणार असून, पहिल्या दिवशी ११०० मिळकतींची माहिती संकलित झाली आहे.

मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले, ‘‘वडगाव धायरी, हिंगणे भागातील ४० टक्क्यांची सवलत घेतली नाही अशा १ लाख ९३ हजार निवासी मिळकतीचे सर्वेक्षण केले जात आहे. ज्या मिळकतीमध्ये स्वतः मिळकतधारक राहत असले तर त्यांना पीटी ३ अर्ज देऊन माहिती संकलित केली जात आहे. आज पहिल्या दिवशी ११०० घरांची तपासणी केली. हे सर्वेक्षण प्रयोगिक तत्त्वावर केले जात असून, त्यानंतर पूर्ण शहरात केले जाईल.”